।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


नाशिकच्या संगीत मैफलींच्या स्वरूपात होणारे बदल

डॉ. आशिष रानडे

कुठलाही संगीत प्रकार म्हणला की त्यात सादरीकरण हे त्या अनुषंगाने आलंच. मग ते कुठल्यातरी देवाला प्रसन्न करण्यासाठी असो, राजाला प्रसन्न करण्यासाठी असो, लोकरंजनासाठी असो.. त्यात त्या ‘कलेचं सादरीकरण’ हा भाग अतिशय महत्वाचा आहेच. त्याशिवाय कुठलीही कला ही परिपूर्ण म्हणता येणार नाही. नाशिक मधील शास्त्रीय संगीताच्या मैफिली आणि त्यांच बदलत स्वरूप या विषयावर उहापोह करताना आपल्याला या मैफिलींच्या बदलत्या स्वरूपा बरोबरच सादरीकरणातही होणारे बदल, रसिक श्रोता आणि प्रेक्षकांची बदललेली मानसिकता आणि एकूणच होणारे सामाजिक बदल यांचा विचार करावा लागणार आहे.

पुराणकाळ- सर्वप्रथम आपण कालखंडाचा विचार केला तर पुराणकाळापासून संगीत मैफिलीचा उल्लेख आपल्याला आढळतो. इन्द्र देवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या दरबारात नृत्यांगना आपल नृत्य सादर करीत आहेत, त्यांना गायक मंडळी आणि वादक मंडळी साथ करत आहेत, भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेश नृत्य करीत आहेत असे वर्णन आपल्याला आढळते.

राजदरबार मैफल – त्या नंतरच्या काळात ऐतिहासिक कथांमध्ये राजांच्या राजदरबारी राजाला खुश करण्यासाठी तसेच राज दरबारातील मंडळीना खुश करण्यासाठी राजगायकांच्या मैफिलीच आयोजन केल जात असे.

गुरुकुल आणि जलसा- याच काळात भारतीय संगीतात अनेक महान गुरु आपल्या गुरुकुलांमध्ये आपल्या शिष्यांना घडवित होते आणि या गुरुकुलांचे जलसे गावोगावी होत असत. या जलश्यांमध्ये मान्यवर गुरु आणि त्यांचे शिष्य ही आपले गायन/वादन सादर करीत असत ज्यामुळे सांगीतिक विचारांची देवाणघेवाण,चर्चा होत असे .

घरगुती बैठक –पुढील काळात या जलश्यांची जागा भारतीय संगीतांच्या बैठकांनी घेतली. भारतातले विविध प्रादेशिक सण तसेच दिवाळी, दसरा, रामनवमी , गुढीपाडवा, होळी या प्रसंगी घरगुती बैठकांचे आयोजन केले जाई ज्यामध्ये मान्यवर गायक / वादकांना आमंत्रित करून जाणकार रसिक श्रोत्यांना ही निमंत्रित करून सांगीताचा आनंद घेतला जाई.

संगीत संमेलन ,संगीत महोत्सव – यानंतरचा काळ म्हणजे साधारण १९६०/७० च्या दशकानंतर मात्र सांगीत मैफिलिंच्या स्वरूपात आमूलाग्र बदल आपल्याला आढळतो. या काळात वरील सर्व मैफिलींची जागा संगीत महोत्सवांनी घेतली. ज्यामध्ये अनेक गायक, वादकांना आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित केलं जाऊ लागलं. हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक हे सादरीकरण पाहण्यासाठी ऐकण्यासाठी जमू लागले आणि जणू मैफल या संज्ञेचा कायापालट झाला .

वरील चर्चेमध्ये आपण प्रत्येक कालखंड आणि मैफिलींचं स्वरूप यावर प्रकाश टाकला. आता आपण नाशिक मधील सांस्कृतिक वातावरण आणि नाशिकमध्ये होणाऱ्या मैफिलींचा विचार करू.

नाशिक हे मुळात धार्मिक स्थळ. श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. त्यामुळे येथील सांस्कृतिक संगीत मैफिलींमध्ये कायम सात्विकतेचा, धर्मिकतेचा सुगंध आपल्याला जाणवतो. उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या किमान १५० वर्षे हून अधिक काळापासून काळाराम राम मंदिरात आयोजित केला जाणारा वासंतिक नवरात्रोत्सव, पिंपळपारावार होणारी पाडवा पहाट, कापड पेठेतील बालाजी मंदिरात होणारा ब्रम्होत्सव, गेल्या १३५ वर्षांपासून मेनरोड वरील गणपती मंदिरात आयोजित होणारा माघी गणेशोत्सव, भाद्रपद गणेशोत्सव ज्यात अगदी बुजुर्ग कलाकारांपासून ते अगदी आताच्या युवा कलाकरांनीही सादरीकरण केलं आहे. आणि हे नाशिकमधील भारतीय बैठकीचं उत्तम उदाहरण म्हणून घेता येईल .

पुराण काळ, राजांच्या राजवटीचा काळ, गुरुकुल पद्धतीचा काळ या सगळ्या कालखंडांमध्ये एक मैफल घडून येण्यासाठी लागणारे तीनही महत्वाचे घटक म्हणजे आयोजक, कलाकार आणि रसिक यांना त्या काळातल्या जीवनशैली प्रमाणे मिळणारा वेळ, रसग्रहण करण्यासाठी मिळणारी शांतता आणि त्या काळातील एकूणच सामाजिक जीवन हे आजच्या तुलनेत स्थिर असल्याने मैफिली या परिपूर्ण होण्याची शक्यता जास्त होती.

मात्र इथून पुढच्या काळात कलाकार आणि रसिकांना मिळणारा वेळ, धकाधकीचं जीवन, एकूणच बदलतं सामाजिक स्वरूप यामुळे मैफिलींच्या आयोजनावर होणारा थोडाफार बदल आणि परिणाम आपल्याला दिसून येतो. नाशिकमध्ये गेल्या ४० ते ५० वर्षाच्या कालखंडात सुरू झालेली गुरुकुले यामध्ये पवार तबला अकादमी, आदिताल अकादमी, कीर्ती कलामंदीर तसेच कलाश्री संगीत गुरुकुल ही गुरुकुले अनेक महोत्सव आणि उपक्रमांचं आयोजन करून भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य उत्तम प्रकारे करीत आहेत. भानुदास पवार पुण्यतिथी समारोह, तबला चिल्ला, श्यामरंग महोत्सव, स्वराधिराज भीमसेन महोत्सव, पं.गोपीकृष्ण महोत्सव, कुर्तकोटी संगीत महोत्सव हे सगळे महोत्सव दरवर्षी रसिकांच्या तुडुंब गर्दीने भरलेले असतात. यामुळे इतर कुठल्याही शहरात होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली, महोत्सवांच्या तुलनेत नाशिकचा रसिक हा अधिक दर्दी आणि कानसेन असल्याचं आपल्याला जाणवतं. हे नाशिक मधील असलेली धार्मिक, सात्विक वृत्ती आणि कलाकरांमध्येही असलेली एकोप्याची भावना यांच प्रतिबिंब आहे असं म्हणता येईल.

काळ जसा पुढे जात गेला तसा रसिक श्रोत्यांचे रूपांतर हे रसिक प्रेक्षक म्हणून होत गेल्याचं आपण बघतो आहोत. गाणं श्रवणीय तर असावचं पण प्रेक्षणीयही असावं या श्रोतृवर्गाच्या मानसिकतेतील झालेला मोठा बदल आपण नोंदवायला हवा.

नाशिकच्या मैफलींच बदलत स्वरूप बघताना आपण जणू भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रवास च बघत आहोत. हे स्वरूप कितीही बदललं तरी भारतीय संगीताचा गाभा म्हणजे आत्मरंजन. आणि आत्मरंजन झालं की ‘हृदया हृदय येक झाले, ये हृदयी चे ते हृदयी झाले’ .. असं आपोआपच होत जातं.

डॉ. आशिष रानडे,

संस्थापक, कलाश्री संगीत गुरुकुल.


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment