AI आणि लिखाण

मी तंत्रज्ञानाबद्दल भविष्यवाणी करायला फारसा उत्सुक नसतो, पण मला पूर्ण खात्री वाटू लागली आहे की काही दशकांनंतर फार कमी लोक लिहू शकतील. खरं तर, लिहिणं हे मुळातच अवघड काम आहे. चांगलं लिहायचं असेल तर नीट विचार करावा लागतो, आणि तोच मुख्य त्रास आहे – कारण स्पष्ट विचार करायला स्वतःचं डोकं लावावं लागतं.
तरीही, बऱ्याच नोकऱ्यांमध्ये लिहिणं आलंच. आणि जितकी नोकरी मोठी, तितकं जास्त लिहिणं आलं.
आता हे एक मोठं टेन्शन आहे – एकीकडे, प्रत्येक ठिकाणी लिहिण्याची गरज आहे आणि दुसरीकडे लिहिणं सोप्पं नाही. त्यामुळे अनेक मोठमोठ्या लोकांनी सरळ सरळ कॉपी-पेस्ट केलंय. विशेष म्हणजे, ते फार काही ग्रेट लिहिलेलं कॉपी करत नाहीत – अगदी सध्यासारखं कुठल्याही टेम्प्लेटमधून सहज तयार होईल असं बेसिक लिखाण चोरतात. म्हणजेच, त्यांना खरंतर लिहिताच येत नाही.
आतापर्यंत या पंचायती मधून सुटायला काहीच पर्याय नव्हता. फार तर तुम्ही कुणाला पैसे देऊन लिहायला लावू शकत होतात, किंवा सरळ कॉपी करू शकत होतात. पण पैसे देऊ शकले नाहीत, आणि कॉपी करायला काही मिळालं नाही, तर लिहावंच लागायचं. त्यामुळे प्रत्येकाला थोडंफार का होईना, लिहिता तरी आलं पाहिजे, अशीच परिस्थिती होती.
पण आता तसं राहिलं नाही. AI आल्यापासून हा पूर्ण गेमच बदलून गेलाय. लिहिण्याचा ताण जवळपास नाहीसा झालाय. शाळेत असो किंवा ऑफिसमध्ये, AI सहजपणे तुमच्यासाठी लिहून देतो.
आता परिस्थिती अशी होईल की समाज दोन भागात विभागला जाईल – एक, जे लिहू शकतात आणि दुसरे, जे अजिबात लिहू शकत नाहीत. काही लोक अजूनही लिहिणार, कारण त्यांना त्यात मजा वाटते. पण जे माफक लिहू शकतात आणि जे अजिबात लिहू शकत नाहीत, यांच्यातला मधला गटच हळूहळू गायब होईल. मग उरतील फक्त दोनच प्रकार – चांगले लेखक आणि जे लिहूच शकत नाहीत.
हे फार वाईट आहे का? नवीन तंत्रज्ञान आल्यावर जुनी कौशल्यं कालबाह्य होतातच. आज लोहार फारसे उरलेले नाहीत, पण त्यामुळे कुणाला काही फरक पडत नाही. पण लिहिणं बंद होणं खरंच वाईट आहे. कारण लेखन म्हणजे विचार करणं. उलट, काही प्रकारचे विचार फक्त लिहूनच करता येतात. यावर लॅमपोर्ट नावाच्या संशोधकाचं एक भन्नाट वाक्य आहे –

“जर तुम्ही लिहिण्याशिवाय विचार करताय, तर तुम्हाला फक्त वाटतंय की तुम्ही विचार करताय.”
म्हणजे काय, तर लिहू शकणारे आणि लिहू न शकणारे असा समाज विभागला गेला, तर तो खरंतर विचार करू शकणारे आणि विचार न करू शकणारे अशा गटांत विभागला जाईल. आणि हे खरंच धोकादायक आहे. मी कुठल्या गटात असावं हे मला ठाऊक आहे, आणि तुम्हालाही ते माहित असणारच.
हे सगळं नवीन नाही. आधीच्या काळात बहुतेक लोक ज्या कामात होते त्यामुळे त्यांची शरीरं मजबूत होत असत. आता ताकद हवी असेल तर व्यायाम करावा लागतो. म्हणजे मजबूत लोक आहेतच, पण फक्त तेच, ज्यांनी ती निवड केली आहे.
लेखनाचंही तसंच होईल. हुशार लोक असतीलच, पण फक्त तेच, ज्यांनी स्वतःला हुशार बनवायचं ठरवलं आहे.
( पॅाल ग्रॅहम यांच्या निबंधावर आधारित)

Leave a comment