।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


आशादायक स्वप्नांपासून ते वेदनादायी अनुभवांपर्यंत !

साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ यांचा एक अनुभव

ही कथा आहे अर्जुनची ! १९ वर्षांचा अर्जुन, तरुण वयातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून होता. या सुंदर, आशादायक स्वप्नापासून सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्याच काही चुकांमुळे, मानसिकतेमुळे त्याला कर्जाच्या खाईपर्यंत कसा घेऊन गेला ते बघुयात.

हे सर्व सुरू झाले एका स्वप्नापासून! परिस्थितींपासून वर येण्याचे, चांगले भविष्य घडवण्याचे स्वप्न! वयाच्या १९ व्या वर्षी, अर्जुन त्याच्या पहिल्या शेअर बाजार कार्यशाळेत सहभागी झाला. तिथे लहान गुंतवणुकीचे रूपांतर मोठ्या संपत्तीत करणाऱ्या इतरांच्या कथा ऐकून तो चांगलाच प्रेरित झाला. झटपट श्रीमंती मिळविण्याकडे त्याचे मन त्याला वळवू लागले आणि त्याने विचार केला, ‘मी का मागे राहू ?’ त्याच्या पिढीतील इतर अनेकांप्रमाणे, अर्जुनचा असा विश्वास होता की आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काही वर्षानुवर्षे वाट पाहण्याची गरज नाही आणि आपणही शेअर मार्केटच्या साह्याने झटपट संपत्ती कमावू शकतो. परंतु तेव्हा त्याला सुतराम कल्पना आली नाही की त्याची ही महत्त्वाकांक्षा त्याच्याच शारीरिक, भावनिक आणि मानसिक खच्चीकरणासाठी इंधन बनेल!

सुरुवातीला अर्जुन शेअर बाजाराविषयी सर्वकाही शिकण्यासाठी उत्सुक होता. त्याने सोशल मीडियावरील पोस्ट्स वाचून एका व्हिडीओ कोर्समार्फत शेअर बाजाराविषयी मोफत शिकण्यास सुरुवात केली. त्याने कॉलेजसाठी मिळणाऱ्या पॉकेटमनी मधून थोडे-थोडे पैसे वाचविण्यास सुरुवात करून ते मार्केटमध्ये गुंतवायला सुरुवात केली. परंतु अनेक नवशिक्यांप्रमाणे, त्याला बाजारातील ट्रेंडची सखोल समजही नव्हती आणि त्याच्याकडे दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी आवश्यक असलेला संयमही नव्हता. लवकरच, त्याच्या सोशल मीडिया फीडमध्ये ‘ शेअर गुरू’ आणि ‘मार्केटमधले धनी ‘ यांच्याबद्दल जाहिराती आणि पोस्ट येऊ लागल्या. अशा ऑनलाईन गुरूंनी त्याला शुल्क आकारून ‘बाजारातील तंत्रे /रहस्ये’ सांगण्याची आश्वासने दिली. त्यांच्या इंटरनेटवर दिसणाऱ्या व्हर्च्युअल आकर्षक जीवनशैलीकडे बघून – लक्झरी कार, डिझायनर कपडे आणि विदेशी सुट्ट्या यांच्या पोस्ट बघून अर्जुनला त्यांच्या कौशल्यांविषयी खात्री पटली आणि तो त्यांच्या टीप्सला बळी पडू लागला.

सापळ्यात प्रवेश

कालांतराने स्टॉक टिप्ससाठी पैसे देणे ही त्याची एक सवयच बनली. त्याच्या मार्गदर्शकाने सांगितलेल्या शुल्काकडे तो भविष्यातील गुंतवणूक म्हणून पाहू लागला. या सेवांसाठी पैसे देण्यासाठी, त्याने त्याच्या पालकांकडून महाविद्यालयीन खर्चासाठी आहे, असे सांगून पैसे घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला, तोटा कमी होता. अर्जुनने विचार केला की प्रत्येकजण तोट्यापासूनच सुरुवात करतो. परंतु कालांतराने होणारे आर्थिक नुकसान वाढतच गेले. या नुकसानाची भरपाई करण्याच्या दबावामुळे तो अधिक धोकादायक व्यवहार करू लागला. लवकरच, पालकांकडून घेतलेले पैसे अपुरे पडू लागले तेव्हा शेअर्समधील गुंतवणूक सुरू ठेवण्यासाठी पेटलेल्या अर्जुनने मित्रांकडे वळून परतफेडीचे आश्वासन देऊन कर्जे घेण्यास सुरुवात केली. पैशांच्या उधारीचे तेही सर्कल संपल्यावर अर्जुनला पेपरलेस कर्ज देणाऱ्या अँपचे जग सापडले. अशी अँप पारंपारिक कागदपत्रे, चौकशी किंवा प्रश्नांशिवाय त्वरित क्रेडिट देण्याचे आश्वासन देतात. या सहजतेला भुलून अर्जुनने अनेक अँपवरून कर्ज घेण्यास सुरुवात केली. त्याबदल्यात अँपकडे त्याने त्याचे फोनमधील सर्व संपर्क, फोटो आणि मीडिया ऍक्सेस फारसा विचार न करता देऊन टाकला. पैसे कमविण्याच्या घाईत त्याने पुढील परिणामांचा अजिबात विचारही केला नाही. प्रत्येक कर्ज त्याला मार्केटमधील आर्थिक तोट्यातून बाहेर आणणारी लाईफलाईन वाटली. हळूहळू कर्जाचा डोंगरच त्याने उभा केला. काही महिन्यांतच, अर्जुनच्या नावे अनेक प्लॅटफॉर्मवर लाखोंचे कर्ज जमा झाले. या अँपमधून कर्ज घेणे सोपे असले तरी, परतफेडीच्या कठोर अटी नंतर समोर येऊ लागल्या. जेव्हा त्याने त्यांचे पैसे परत करणे चुकवायला सुरवात केली तेव्हा त्याला सुरुवातीला कॉल्सवर जेन्टल रिमाइंडर्स यायला लागले ज्यांचे रूपांतर नंतर धमक्यांमध्ये झाले. अ‍ॅप्सवरील वसुली एजंट असा मानसिक छळ करण्यापुरतेच थांबले नाहीत तर त्यांनी अर्जुनने दिलेल्या स्मार्ट फोन ऍक्सेसचा फायदा घेत त्याच्या फोनच्या फोटो गॅलरीमध्ये प्रवेश केला. घरातील आई, बहीण आणि महिला मैत्रिणींचे फोटो वापरून, ते अश्लीलरित्या मॉर्फ करून व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या आणि तसे केलेही. तेव्हा मात्र अर्जुन जाम घाबरला. सतत येणारे कॉल्स, त्याच्या वाढत्या आर्थिक नुकसानीचा आणि कर्जाचा दबाव आणि त्याचे कुटुंबीय अपमानित होण्याची भीती यामुळे तो सतत चिंतेच्या गर्तेत राहू लागला. त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना टाळू लागला, स्वतःला खोलीत बंद करून घेऊ लागला.

मानसिक तोल सावरण्याचा प्रयत्न
माझ्या थेरपी ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा अर्जुन आर्थिक कर्जामुळे मानसिक संतुलन गमाविण्याच्या सीमेपर्यंत आला होता. माझ्यासमोर त्याने अशा रात्रींचे वर्णन केले जेव्हा तो झोपू शकत नव्हता. धमकीच्या फोन कॉल्स किंवा मेसेजच्या भीतीने पछाडला होता. त्याने त्याच्या पालकांचा विश्वासघात केल्याबद्दल त्याला वाटणाऱ्या अपराधीपणाबद्दल, मित्रांकडून कर्ज घेऊन त्यांना फसविल्याबद्दल आणि आलेल्या आर्थिक अपयशाबद्दल त्याच्या मनात दाटून आलेल्या भावनांबद्दल मला सांगितले. तो जेवत नव्हता, त्याचे वजन खूपच कमी झाले होते आणि त्याला सतत थकवा जाणवत होता. वसुली एजंटांकडून होणारा छळ शिगेला पोहोचल्यानांतर कर्ज आणि लाजेतून सुटण्याचा एकमेव मार्ग आत्महत्या आहे असे मानण्यास त्याने सुरुवात केली होती. सुदैवाने एका क्षणी त्याने त्याच्या पालकांना सत्य सांगण्याचा पर्याय निवडला. ते सोपे नव्हते. त्यांना सत्य सांगणे म्हणजे त्याचा खोटेपणा, त्याच्या चुका आणि त्याचे अपयश उघड करणे होते. पण त्याला पालकांकडून दिलासा मिळाला. त्यांच्या सुरुवातीच्या रागाची जागा अर्जुनच्या काळजीने घेतली आणि त्यांनी १९ वर्षीय अर्जुनने उभे केलेले जवळजवळ ८ लाखांपर्यंतचे कर्ज फेडले. भावनिक ताण दूर करण्यासाठी माझे उपचार घेण्याचा आग्रह धरला.

वास्तविक चित्र
अर्जुनची कहाणी काही वेगळी नाही. हजारो तरुणांना जलद संपत्ती मिळविण्याचा मोह, सोशल मीडियावरील शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी होणारी विविध ऑनलाईन मार्गांची जबरदस्त जाहिरातबाजी आणि त्वरित कर्जाची सोपी पण फसवी पद्धत यांमुळे अशाच प्रकारच्या सापळ्यात अडकवले जाते आहे. अशा अनुभवांचा मानसिक परिणाम अनेकदा दुर्लक्षित केला जातो.तेव्हा तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी काय बदल करायला हवेत ते बघुयात.

काय बदलण्याची आवश्यकता आहे?
१. आर्थिक साक्षरता: शाळा आणि महाविद्यालयांनी त्यांच्या अभ्यासक्रमात आर्थिक शिक्षण समाविष्ट केले पाहिजे. तरुणांना व्यापार, कर्ज घेणे आणि ‘त्वरीत श्रीमंत व्हा’, सारख्या योजनांमागील अदृश्य धोके समजावून सांगणे आवश्यक आहे.
२. कर्ज अँप्सचे नियमन: यांच्याद्वारे प्रचलित विखारी पद्धती रोखण्यासाठी सरकारी IT अधिकाऱ्यांनी अशा अँप्ससाठी नियमन / कायदे केले पाहिजेत. त्यांची कर्ज घेण्यासाठी वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करणे ही पूर्वअट अत्यंत धोकादायक असू शकते.
३. घरातील वातावरण: कुटुंबांमध्ये पैशांबद्दलची चर्चा खुली, प्रामाणिक असावी. यासाठी अर्थसंस्कार घडावेत. पालकांची समजावून घेण्याची, आधार देण्याची वृत्ती असली की मुले त्यांच्या समस्या उघडपणे बोलू शकतात. मात्र घरात धाकधपटशाचे वातावरण असल्यास मुले त्यांना असणाऱ्या समस्या उघडपणे बोलू घालत नाही आणि त्याचे रूपांतर जीवाच्या धोक्यामध्येही होऊ शकते. पालकांनी मुलांच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणेही आवश्यक आहे.
४. मानसिक आरोग्य समर्थन: मानसिक आरोग्य समस्यांमध्ये आर्थिक ताण हा एक महत्त्वाचा घटक आहे. योग्य थेरपी आणि समुपदेशनाची आवश्यकता बऱ्याच जणांना असते. ते वेळेवर होणे गरजेचे आहे.

आशेचा किरण
आज, अर्जुन हळूहळू त्याचे जीवन पुन्हा उभे करत आहे. थेरपीमुळे त्याला त्याची चिंता दूर करण्यास, त्याच्या अपराधीपणावर काम करण्यास आणि समस्येचा निरोगी मनाने सामना करण्याची मदत मिळाली आहे. त्याने आर्थिक साक्षरता मिळविण्याच्या दिशेने छोटी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे आणि आता त्याला संयम आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे मूल्य समजले आहे.

त्याची कहाणी, तरुण पिढी किती सहजपणे आर्थिक सापळ्यात अडकू शकते याची जाणीव प्रकर्षाने करून देते. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी आर्थिक ताण किंवा कर्जाशी झुंजत असेल तर बोला, मदत मागा, ती उपलब्ध असते. कोणतीही चूक तुमच्या मानसिक आरोग्यापेक्षा किंवा तुमच्या जीवनापेक्षा जास्त मौल्यवान नाही !

साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ

संपर्क: +91 91682 02878


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment