।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


भावपूर्ण काव्य-श्रद्धांजली स्व . उस्ताद झाकीर हुसेनजींना.

श्री. शंतनु श्रीरंग गुणे.

त्याच्या ह्रुदयी होती शिवतांडवातली शिवभूत लय

आणि डमरूतल्या अंगभूत उर्जेचा, आहत नाद,

जन्मतःच गुरूपित्याने,अभिजात तालमंत्राची संथा देत,

घातली सृष्टीच्या सृजनत्वाला साद !

विधात्याच्या प्रसन्न आशिर्वादातून उमलले ते नादपुष्प,

लयतालाभिषेकातून, अखिल मानवाजातीवर नादब्रह्माचा वर्षाव करायला,

प्रत्येक व्यक्तित्वात असलेल्या,

सुप्त वा प्रकट सांगितिक तत्वाला, जागृत व चैतन्यमय करायला !

त्याच्या नुसत्या आगमनानेच, कलामंचावर अवतरायची साक्षात सरस्वती,

तबल्यावर थिरकणांऱ्या बोटांमधून, तालविद्येची साक्षात गंगाच प्रवाहित व्हायची,

गायन वादन नृत्य, या संगीताच्या तिन्ही मूलस्त्रोतांमधे ती सहज मिसळून जायची !

नवशिका असो वा जेष्ठश्रेष्ठ साधक, वृद्ध असो वा उत्साहाने सळसळते बालक,

सारे सारे त्या नादगंगेने, शुचीर्भूत व्हायचे त्या नादचिंब स्मृतीने.

त्या साऱ्यांचे पुढचे अनेक दिवस, नादानंदात जायचे !

तो स्वर्गीय यक्ष, अवतरला होता पृथ्वीवर,

भौतिकतेच्या चक्रव्यूहात रुतलेल्या , मानवाच्या सुखासीन जाणिवांना शाश्वत आनंदाचे भान देण्यासाठी,

साधनेतून प्रकट होणाऱ्या सहजाविष्कारातून, यांत्रिकतेत अडकत चाललेल्या मानवाला,

शाश्वत आनंदाप्रती सजग करण्यासाठी !

तो त्याच्या नादरंगात , संपूर्ण रंगलेला असतानाच,

भगवंताला वाटले, या यक्षाला परत बोलवावे,

त्याच्या प्रतिभेचे अनोखे रंग, देवभूमीत वहावे !

पूर्ण उमललेले नादपुष्प, अचानक देवाघरी गेले,

नादगंगेच्या प्रवाहाचा आनंद घेणारे, सारे स्तब्ध शोकाकूल झाले.

आता पुढे काय, या निरुत्तर करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर,

सारे सैरभैर होत शोधू लागले !

पण हे मानवा, आश्वस्त रहा कारण, यक्षाच्या अभिजात नादाविष्कारातून,

त्याच्या नकळत उधळली गेलेली, नादपुष्पांची अगणित बीजे,

नादगंगेच्या प्रवाहाने पुलकित केलेल्या, अनेक संवेदनशील मनांत रुजत आहेत.

आणि त्यातून परत काही अलौकिक नादपुष्पे, अखिल मानवजातीच्या नादानंदासाठी

नादसुगंधाने बहरणार आहेत !

हे आवर्तन असेच सुरू रहाणार आहे, कारण,

ही अनेक ऋषितुल्य साधकांच्या साधनेने ओलावलेली, सृजनत्वाचा आशिर्वाद लाभलेली,

तथास्तू मंत्राने भारलेली, भरत भूमी आहे !

ओम शांतीः !

-श्री. शंतनु श्रीरंग गुणे,

रचना : १७/१२/२०२४


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment