सौ. विभा सुनील बोकील
हृदय….

प्रत्येक श्वासाबरोबर, स्पंदने चालती हृदयाची,
रात्र अन दिवसाची खरोखर, अथक सेवा चाले कायेची !
चाले भाव भावनांचे मंथन, होई संवाद अपुलाच आपल्याशी,
अंतरंगी होई चालचलन, येती अंतरीचे बोल ओठाशी !
साठती कित्येक सुखदुःखे, असे प्रेम माया जिद्द लालसा,
असती कित्येक कप्पे अनुभवांचे, परी धडधडून अविरत देई दिलासा !
प्रत्येकाच्या हृदयांची, रूपे निरनिराळी असती,
हळवे, कोमल, मृदू, मुलायम, खाष्ट, दुष्ट, निष्ठुर आणखी किती !
मनाचे घर आहे हृदयी, सुहृद शांत दिलखुलास मनस्वी,
त्यात आनंदाला असावी जागा, तुझे आहे तुजपाशी सर्वस्वी !

जोगवा…

सिहासनी गे तुजला स्थापूनी,
श्वासांचा हा धूप जाळूनी,
सुगंध उधळिते,
चैतन्याची पोत घेऊनि,
जोगवा मागते आईचा, जोगवा मागते…..
तूच अहिल्या तूच द्रौपदी,
तूच जननी माता,
सती सावित्री तूच ती सीता,
अनेक रूपे तूझी स्मरूनी,
पूजन मी करते,
जोगवा मागते आईचा…..
कवडी रुपी शब्दांची घालुनिया माळ,
उत्साहाच्या संचाराने वाजवीते संबळ,
अन्यायाचे दैत्य माजले,
देई आम्हा बळ,
परडी घेऊनि सामर्थ्यांची,
स्त्री शक्ती जागते अंबे,
स्त्री शक्ती जागते,
जोगवा मागते आईचा जोगवा मागते….


सौ. विभा सुनील बोकील
उप कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग लातूर

Leave a comment