।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


स्त्री आणि काॅॅर्पोरेेट जग

डाॅ.सौ.मृणालिनी दोडके.

गेली २५ वर्ष काॅॅर्पोरेेट जगताचा अनुभव घेतल्यानंतर एक सुजाण स्त्री म्हणुन काॅॅर्पोरेेट जगतातील स्त्रीची वाटचाल आणि त्या अनुषंगाने कार्पोरेट मधील चांगली व वाईट बाजू मांडणे ह्यावर आजचा लेख. नोकरदार स्त्रियांचा कारकिर्दीकडे बघण्याचा दृष्टीकोनही कसा महत्वाचा आहे हेही मांडण्याचा हा प्रयत्न !

सौ. सूधा मूर्ती ह्यांचेकडे आज सारे जग अभिमानाने बघते. त्यांचा प्रवास हा सर्वांना थक्क करून सोडणारा आहे. जेंव्हा अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेण्याचा, कोणी मुलगी विचारही करत नव्हती तेंव्हा त्यांनी काॅलेजमधे प्रवेश तर घेतलाच शिवाय तिथली गैरसोय अनुभवून आपले शिक्षण डिस्टिंक्शन मधे पूर्णही केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर TELCO सारख्या कंपनीत त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला. अर्ज करतेवेळी त्यांना माहित होते की, TELCO कडून, ‘नोकरीसाठी मुलींनी अर्ज करू नये’, अशी टिप दिलेली आहे. जेंव्हा त्यांची मुलाखात घेणे नाकारण्यात आले तेंव्हा त्यांनी हार न मानता, TELCO चे सर्वेसर्वा श्री. जे. आर. डी, टाटा यांना पत्र लिहून , ‘मी का आणि कशी ह्या कामासाठी अनुकूल आहे’, हे पत्राद्वारे कळविले आणि तिथे नंतर नोकरीही मिळवली. इथे दिसते ती त्यांची जिद्द, काम करण्याची तळमळ आणि न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न ! जिथे प्रयत्न मनापासून असतात तिथे नक्कीच तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो, नाही का ? नकारात्मक परिस्थितीतही आपली जिद्द, ऊत्तम संधी शोधण्याचा गुण सोडता कामा नये!

आज तर अनेक मोठ्या कंपनी, बॅंकांमध्ये, सरकारी नोकरीत, सनदी क्षेत्रात, हवाई क्षेत्रात, मिलिट्रीत, डाॅक्टरी पेशात आपण यशस्वी झालेल्या स्त्रिया बघतो आणि ऊर अभिमानाने भरून येतो. अगदी ५-६ वर्षापूर्वी बॅंकिंग/आर्थिक क्षेत्रात अनेक उच्चपदस्थ स्त्रिया होत्या/आहेत. जसे की चंदा कोचर ( ICICI) , अरूंधती भट्टाचार्य ( SBI), शिखा शर्मा ( Axis Bank). राधिका गुप्ता (Edelwise Mutual Fund) आणि इतर अनेक ! आपल्या कारकिर्दीत ह्या स्त्रियांनी त्याची क्षमता सिद्ध केली आहे. समाजात काय किंवा काॅॅर्पोरेेट जगात काय, स्त्री तिच्या पुरुष सहकाऱ्यांइतकीच सक्षम आहे हे आज सिद्ध झाले आहे. एखादी स्त्री जर आपले घर, कुटुंब सांभाळुन अर्थार्जनासाठी घराबाहेर पडत असेल तर तिला सर्वानीच प्रोत्साहन दिले पाहिजे ! हे प्रोत्साहन लहान-सहान मदतीच्या स्वरूपात घरात आणि कार्यालयीन ठिकाणी मिळाले पाहिजे.

सद्यस्थितीत अनेक छोट्या आणि मोठ्या कंपनीत स्त्रिया काम करत आहेत. मोठ्या कंपनीतील वातावरण त्यामानाने सुरक्षित असते आणि स्त्रीचा प्रगती करण्याचा मार्ग सुकर असतो. पण त्यातही डथळे नाहीत असे नाही. जसे की मॅटर्निटी लिव्ह वाढवून जरी मिळाली तरी स्त्रिला त्यावर्षी प्रमोशन मिळत नाही किंवा तिची पगारवाढ होत नाही. हे कितपत योग्य आहे? हे केवळ ती स्त्री आहे म्हणून नव्हे का? पण दुर्देवाने अशावेळी निदर्शनास येते की स्त्रीच शस्त्र टाकते आणि ह्यासाठी लढत नाही, सहज स्विकारते की तिची पगारवाढ आता होणार नाही. अशावेळी आपली कार्यक्षमता योगदानाने सिद्ध करून लढा दिला पाहिजे ! काही नोकरीच्या ठीकाणी, काही संस्था स्त्रियांना आपले अंडकोश बॅंकेत ठेवण्यासाठी अर्थसहाय्य करतांना दिसतात जेणेकरून आपली स्त्री सहकारी तिचा प्रगतीचा महत्वाचा काळ वगळून नंतर सोयीनुसार गर्भधारणा करू शकेल. पण ऐवढा कठीण मार्ग स्वीकारण्यापेक्षा, एखाद्या हुशार आणि तरूण स्त्रीला कंपनीतच अशी सोय दिली की ‘निसर्ग नियमाप्रमाणे तुम्ही आपले वैवाहिक आयुष्य जगत असताना तुम्हाला बाळाची चाहूल लागली तर कंपनी तुम्हाला सर्वतोपरी सहाय्य करेल’, तर ही वेळ येणार नाही ! ह्याबाबतीत Additional Solicitor General, Supreme Court मधील माधवी दिवाण म्हणतात की स्त्रियांनी आता अश्या अधिकारासाठी लढले पाहिजे. पण त्या हे देखील म्हणतात की She needs to bounce back quickly and again come in mainstream! कंपनीकडून सवलत घेणे आणि नंतर त्याची योग्य दखल न घेणे हे योग्य नव्हे. शेवटी कंपनी ही व्यवसाय करते याची नोंद स्त्रियांनीही ठेवले पाहिजे आणि त्याप्रमाणे योगदानही दिले पाहिजे. कंपनीत मिळणाऱ्या सुविधा, सुरक्षा ह्यांची देखील जाण ठेवणे हे प्रत्येक नोकरदार स्त्रीची जबाबदारी आहे. Work from home, maternity leave, sabbatical leave या कंपनीने दिलेल्या सोयी स्त्रीने जबाबदारीने हाताळल्या पाहिजे. ज्यावेळी तुम्ही स्त्री सक्षमतेची भाषा बोलता त्यावेळी ती तुमच्या वर्तणुकीतही प्रतीत व्हायला हवी.

व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या आणि नोकरी करणाऱ्या मुलींना काही वेळेस नोकरीच्या ठिकाणी दुय्यम दर्जा देण्यात येतो. सारखी गुणवत्ता असून देखील उच्चपदस्थ पोस्टवर जाण्यास स्त्रीलाच तिचे सर्वस्व पणाला लावावे लागते. इथे कंपनीलाही योग्य नैतिक दृष्टीकोन दाखविणे निकडीचे असते. अशावेळी लोकांची सहानभूती न घेता किंवा योग्यता, शिक्षण, संधी याबाबतीत वरचढ असताना माझ्यापेक्षा माझ्या नवर्‍याची नोकरी जास्त महत्वाची आहे असे मान्य करून लगेच माघार घणे हे कितपत योग्य आहे हे स्त्रीनेच ठरवावे. उपाय अनेक असतात. पण शस्त्र टाकून देणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे. आपल्या नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ लोकांशी बोलणे करून, घरी सहचार्या बरोबर चर्चा करून एक मध्यम मार्ग काढणे शक्य असते. ह्यात स्त्री आणि पुरुषांमधील लवचिकता कामास येते. गर्भधाररणेननंतर परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर नोकरीत खंड पडला आणि इतरत्र नोकरी शोधावी लागली तर स्त्रीला कमी पगाराची नोकरी स्विकारावी लागते. ही आजची कठीण परिस्थिती असल्याने बर्‍याच स्त्रिया लग्नबंधन स्विकारत नाही किंवा संतती होवू देत नाही. हे समाजासाठी कितपत योग्य आहे ? तेव्हा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप असल्यास अशी वेळ येणार नाही !

लहान कंपनीत ज्यावेळी स्त्री काम करते त्यावेळी वातावरण बरेच घरगुती असते. त्याचे जसे फायदे तसे तोटेही आहेत. पण त्या कंपनीत देखील सुरक्षितता, कामाचे तास, वर्तणूक नियम ह्याबद्दलची सारी माहिती असणे, त्याबद्दल पॉलिसीज गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक झाली तर POSH ACT सारखे कठोर शस्त्र आहे. हा आवाज स्त्रीला उठवावा लागेल. पण जिथे आपल्या अधिकाराची जाणिव करून घेणे नाही, तिथे सक्षमता दूर रहाते. लहान कंपनीतही स्त्रीने आपली सचोटी, कार्यक्षमता आणि वागणुकीने छाप पाडल्यास तिला आदर आणि सन्मान मिळाल्याशिवाय रहाणार नाही.

आज उद्योग जगतात अनेक संधी आहेत. इथे कस लागतो तो फक्त सचोटीचा, गुणवत्तेचा आणि तुमच्या सकारात्मकतेचा ! Sky is limit.. Those who want to reach there will have to struggle hard. Let’s prove the merit and win the game. माॅडर्न आऊटफिट पेक्षा माॅडर्न आऊटलूक केंव्हाही स्त्रीची सक्षम बाजू जगासमोर निर्विवाद स्पष्ट करेल ह्यात शंका नाही.

डाॅ.सौ.मृणालिनी दोडके. IT Consultant,


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment