डाॅ.सौ.मृणालिनी दोडके
स्व. श्री. रतन टाटा ह्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळतो आहे. त्यांच्याविषयी असलेले प्रत्येक भारतीयाचे प्रेम हे शुद्ध, सात्विक आणि पवित्र आहे.

सहजच मनात विचार आला की ‘विठू माऊली’ हा उच्चार मनात आला की जसे प्रेम दाटून येते तसेच प्रेम ‘टाटा’ हा शब्द उच्चारला गेला की हृदयातून प्रकटते. विठू माऊली ही अनुभवण्याची भावना आहे आणि टाटा सुद्धा !! तो अनुभव बहुतांश भारतीयांनी त्यांच्या उत्पादित वस्तूतून, त्यांच्या सामाजिक मदत कार्यातून किंवा काहींनी त्यांच्या अनेको संस्थांमध्ये काम करून घेतला आहे. स्व. श्री. रतन टाटा यांनी यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांनी घडविलेली माणसं, त्यांनी घालून दिलेले उत्कृष्टतेचे मापदंड, त्यांनी अंमलबजावणीतून शिवकलेली मूल्ये हे सारे सारे अचंबित करणारे आहे!
विठूमाऊली जशी लेकुरवाळी तसेच साऱ्यांना सामावून घेणारे टाटांचे साम्राज्य ! अनेक उद्योग, अनेक कंपन्या, अनेक उत्पादने. मोजता येणार नाही एवढे सारे काही. पण त्यात मोठे ते ग्राहक ! ग्राहकांप्रतीअसलेली प्रामाणिकता, देशाप्रती असलेला अभिमान आणि देशाला पुढे नेण्याची त्यांची जिद्द अफलातून. विठूमाऊली जशी भक्ताला घास भरविते तसाच हा रतन टाटाचा समूह. अगणित उद्योग, त्यात काम करणारी माणसे, त्यांच्यासाठी असलेल्या सोयी आणि माया सारे दिव्यच. जेथे इतर संस्थांमध्ये कष्ट करणाऱ्यांचा घास, हक्क निर्दयतेने काढून घेतला जातो तेथे ह्या कंपनीत काम करणाऱ्याला मात्र आपले छत्र आणि घास दोन्हीही सुरक्षित असल्याची भावना आजही आहे. कर्मचाऱ्यांसाठी अनेक चांगल्या सुविधा या समुहाच्या संस्थांमध्ये असतात. याचकरिता प्रत्येकाला हा समूह म्हणजे आपला परिवार वाटतो ह्यात शंकाच नाही. सुरक्षितता, लिंग समानता, आदर, कार्यतत्परता ह्याचे नाव म्हणजे टाटा. कर्मचाऱ्यांसाठी ‘सेकंड करियर’ ही फक्त टाटा ने राबवलेली संकल्पना. किती तो आपल्या समूहातील काम करणाऱ्या प्रत्येकासाठी केलेला उदात्त विचार.
विठुमाऊली जगात आहे. पण ती दिसत नाही. दिसते ती कोणाच्या तरी रूपात. तसेच रतन टाटा अगदी क्वचितच दिसले असतील. पण ते सतत आम्हाला दिसत असायचे ते त्यांनी घडविलेल्या व्यक्तित्वांमधून. मग ते रामदुराई असो वा नटराजन चंद्रशेखरन असो ( सध्याचे टाटा समुहाचे चेयरपर्सन ) वा गोपीनाथन. हे सारे TCS चे उच्चपदस्थ. कोणीही जावून त्यांच्याशी बोलू शकतील अशी ही माणसे म्हणजे त्यांचे हात. एकदाच रतन टाटा मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्टवर दिसले. गुलाबी रंग, उंच आणि भरीव बांधा, स्मित हास्य बघूनच एवढे दडपण आले की बापरे ! टाटांकडील लग्न, समारंभ किंवा वार्षिक सर्व साधारण सभा कधीच जगजाहीरपणे होत नाहीत. कारण त्यांना दिसत असते ती समाजातील निम्न स्तरातील व्यक्तींची अवस्था. म्हणून त्यांच्यामार्फत सतत घडतो तो परोपकार.

विठूमाऊली म्हणजे विष्णू! विष्णूचे रूप जर पाहिले तर ते सर्वांग सुंदर पोलादी शरीर असे आहे. विष्णूच्या अगदी कपड्यांपासून ते दागिन्यापर्यत सारे सौंदर्याचे प्रतिक. तसाच हा टाटा समूह. टाटा स्टील पासून ते तनिष्क ज्वेलरी पर्यंत आणि टाटा केमिकल्स पासून टायटन घडायाळापर्यंत सगळीकडे पसरलेला. आधुनिकतेची कास असलेल्या ह्या समूहाने ‘झुडियो’ हा ब्रॅन्ड भारतात आणला आणि असंख्य युवकांना ह्या ब्रॅन्डशी जोडले. विठ्ठलाचे वाहन गरूड तसेच टाटा समूहाचे वाहन.. टाटा मोटर्स. भरधाव चालणाऱ्या ट्रक्स, टेंपो,ट्रेलर, चार चाकी, SUV पाहिल्या की ऊर भरून येतो. टाटा च ते, डोळ्यासमोर नेहमीच संपूर्ण भारताचे चित्र. म्हणून टाटा टेम्पो ते टाटा नॅनो आणि टाटा हॅरियर ते टाटा जग्वार असे सर्वदूर दिसणारे वाहन म्हणजे भारताची शान आहे. विठ्ठलाचा वास हा सर्वत्र आणि सर्वदूर पसरला आहे. पण त्याच्या मंदिरात गेल्यावर जे समाधान मिळते तसेच समाधान टाटांच्या ऑफीस मधे गेल्यावर मिळते. त्या ऑफीसमधे कुठल्याही टाटा समूहातील व्यक्तींचा फोटो नाही लावलेला नसतो. ना जहांगीर टाटा, ना जमशेठजी टाटा. दिसतात ती फक्त Vision, Mission आणि Qualtiy Policy ची चित्रे ! टाटा समूहातील ‘TATA CONSULTANCY SERVICES’ म्हणजे मुकुटमणी. ह्याच कंपनीने भारताचे नाव जगभर पसरविले.आज मला अभिमान आहे की रतन टाटांच्या कंपनीत मी योगदान देऊ शकले. विठूमाऊली म्हणजे दातृत्व. तसेच टाटा समूह म्हणजे दातृत्व. मग ते TATA CANCER MEMORIAL असो वा TATA TRUST, TISS. अशा अगणित परोपकारी संस्था टाटांनी स्थापन केल्या, मोठ्या केल्यात आणि त्यांचे लोकार्पणही केले.
आज रतन टाटा आपल्यात नाहीत. पण देव जसा दिसत नसूनही तो आपल्याला जाणवतो तसेच रतन टाटांचे व्यक्तीमत्व, त्यांनी घालून दिलेली मूल्ये, त्यांनी दाखवून दिलेला स्वच्छ यशाचा मार्ग आपल्या स्मरणात कायम राहील.
RATAN TATA Ji – WE WILL MISS YOU.
डाॅ.सौ.मृणालिनी दोडके
Ex- Employee TATA CONSULTANCY SERVICES

Leave a comment