सौ. विभा सुनील बोकील
सखी…

सखी तू येतेस पावसात,
चैतन्याची होते बरसात,
उत्साहाला आणतेस सोबत,
लकेर विजेची जशी काळोखात…
ठोठावतेस दार मनाचं,
नसे कांही आडपडद्याचं,
मनातल्या मोकळ्या गप्पांचं,
नातं दिलखुलास सहवासाचं…
येतेस स्नेहाचा सांकवं बांधत,
भावभावनांची बाग फुलवत,
फुला पानांची तोरणे लावत,
मैत्रीचे बीज घट्ट रुजवत….
येणे तुझे असे कसे उतावीळ,
बरसणे असे की अवखळ,
उघडतात मनाची दारं खळखळ,
सखी माझी पावसाळी निर्मळ…

फुलपाखरू…

भिरभिरते फुलपाखरू,
किती विहरते ते स्वछंद,
या तरुवर त्या वेलीवर,
हाच त्याचा जीवनानंद…
झुळकन सुळकन,
इकडून तिकडे,
कळ्या फुलांच्या पानाआडून,
मुक्तपणे ते कसे बागडे…
मला वाटे फुलपाखरू होऊन,
रानवनातून मुक्त विहरावे,
मधु फुलांचा प्राशून घेऊन,
गोडीत त्याच्या विरून जावे..
जीवनाच्या या उपवनी,
स्वैरपणे घ्यावे विहरून,
पर स्वप्नाचे घ्यावे लावुनी,
जावे अस्तित्वाचे भान हरपून….
फुलपाखरू ईश्वरी रूप नाजूकसे,
तरु लतांना जवळून भेटे,
होई मिलन आत्मा परमात्म्याचे,
स्वर्गीचे सुख त्यापुढे थिटे…

सांजवेळ…

सांजवेळ सख्या आयुष्याची,
पाहता पाहता समीप आली,
आठवणीच्या हिंदोळ्यावर बसुनी,
विचारू आता ख्यालिखूषाली..
जीवनातल्या उष:काली,
भेटलो होतो योगायोगे,
संसार रथाची चाके आपण,
ओढली होती साथीसंगे…
माध्यान्हीच्या अनुतापाने,
सुकलो चुकलो परी चाललो,
तापलो रापलो अधिक श्रमाने,
तरी कधी ना अडखळलो..
बाग बहरली लता तरुंनी,
फुलली फळली अधिभाराने,
दिवस सुगीचे आले निश्चित,
नटले सजले घरपण आपलेपणाने ..
झाली सामसूम किनाऱ्यावरती,
होता क्षणिक काय गलबला,
कातरवेळ ही दाटून आली,
रंग केशरी निळ्या नभाला….
.
सांजवेळ ही घेऊन आली,
संध्या छायाच्या वर्दी येण्याची,
मनीची हुर.हूर वाढू लागली,
सांजसमयी साथ तुझी बहुमोलाची…


विभा सुनील बोकील
उप कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग लातूर

Leave a comment