डॉ.क्षमा वैरागी
जगभरात कर्करोगाचे प्रमाण फार वाढत आहे. भारतातही कर्करोग रुग्णांची संख्या बरीच वाढत चालली आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे हा आजार ही एक गंभीर समस्या बनली आहे. जवळजवळ प्रत्येकाच्या परिचयात कर्करोग झालेल्या तसेच ककरोगामुळे मृत्यू झालेल्या व्यक्ती असतातच. पण जसे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याच बरोबरीने त्यावरील संशोधनाचे प्रमाणही वाढत आहे . कर्करोग ओळखण्यासाठी अनेक प्रकारच्या तपासण्या ,चाचण्या उपलब्ध आहेत . जगभरातील वैद्यकीय शास्त्रात खूपच प्रगती होत आहे, विविध प्रकारच्या आणि विविध अवस्थेतील कर्करोगावर अनेक नवीन प्रभावी उपचार पद्धतींचे शोध लागत आहेत , भारतातील टाटा मेमोरियल हॉस्पिटल कर्करोगावर मात करण्यासाठी अविश्रांत आणि अव्याहतपणे झटत आहे.
आता आपण कर्करोग म्हणजे काय ? तो कसा होतो ? त्याची सुरुवात कशी होते ? या विषयी माहिती जाणून घेऊया.

आपले शरीर हे अनेक प्रकारच्या लाखो पेशींनी बनलेले आहे. या पेशी आपल्या आयुष्यभर सामान्यपणे वाढतात आणि आवश्यकतेनुसार विभाजित होतात. जेव्हा पेशी असामान्य असतात किंवा खूप जुन्या (वृद्ध )होतात तेव्हा त्या सहसा मरतात आणि त्यानंतर नवीन पेशी त्यांची जागा घेतात. या प्रक्रियेत काही चूक झाली की कर्करोग सुरू होतो. शरीरातील पेशी या नवीन पेशी बनवत राहतात आणि जुन्या किंवा असामान्य पेशी मरत नाहीत. कर्करोगाच्या पेशी नियंत्रणाबाहेर वाढल्यामुळे त्या सामान्य पेशींना बाहेर काढू शकतात यामुळे तुमच्या शरीराला पाहिजे तसे काम करणे कठीण होते. या सुव्यवस्थित प्रक्रियेत व्यत्यय येतो तेव्हा कर्करोग(Cancer) सुरू होतो. यामध्ये शरीरातील काही पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि शरीराच्या इतर भागात पसरतात. कर्करोग मानवी शरीरात जवळजवळ कोठेही सुरू होऊ शकतो. या अनियंत्रित आणि अनियमितपणे वाढलेल्या पेशी एक वस्तुमान बनवू शकतात ज्याला ट्यूमर म्हणतात. ट्यूमर कर्करोगजन्य किंवा सौम्य (Benign) असू शकतो. सौम्य ट्यूमर म्हणजे ट्यूमर वाढू शकतो पण पसरणार नाही. जेव्हा कर्करोगाची गाठ घातक(Malignant) असते तेव्हा ती वाढू शकते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकते.
कर्करोग कशामुळे होतो?
कोणालाही कोणत्याही वयात कर्करोग होऊ शकतो. परंतु जसजसे वय वाढत जाते तसतसे कर्करोग होण्याचा धोका सामान्यतः वाढतो. कर्करोगाचे प्रमाण ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये जास्त आढळते अधिक आढळते. तुमचे वय काहीही असो, तुमचे शरीर अनेकदा काही संकेत देत असते त्याकडे वेळीच लक्ष देणे आणि तुम्हाला तुमच्या शरीरात काही असामान्य बदल झालेला आढळल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोलणे नेहमीच हितावह तसेच आवश्यक असते. कर्करोगाविषयी ची योग्य माहिती असल्यास, निरोगी जीवनशैली असल्यास, सातत्याने नियमित तपासणी व चाचण्या करत असल्यास आणि प्रारंभिक चिन्हे आणि लक्षणे याकडे योग्यवेळी लक्ष दिल्यास आपण कर्करोगाच्या दोन पावले पुढे राहू शकतो .
शरीराच्या विशिष्ट अवयवांच्या कर्करोगाची काही साधारणतः आढळणारी लक्षणे:
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे : गिळण्यास त्रास होतो, बऱ्या न होणाऱ्या तोंड किंवा जिभेवरील फोड किंवा जखमा, तोंड उघडण्यात अडचण, तोंडातील पांढरे किंवा लाल चट्टे,
श्वसन संस्था ,घसा अथवा अन्ननलिकेच्या कर्करोगाची लक्षणे: आवाजात बदल होणे, वारंवार त्रासदायक खोकला होणे अथवा तो बरा न होणे, तोंडावाटे रक्तस्त्राव होणे, खोकताना रक्त पडणे, गिळण्यात अडचण, घशात सतत वेदना होणे
पोटाच्या अथवा पचन संस्थेच्या कर्करोगाची लक्षणे: शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे ,सतत बद्धकोष्टता किंवा लूज मोशन होणे, शौचावाटे , मूत्र मार्गातून रक्तस्त्राव होणे अथवा त्यावरील नियंत्रण गमावणे, सतत पोट फुगणे, सतत छातीत जळजळ, किंवा अपचन, भूक न लागणे ,किंवा सतत उलटीची भावना होणे किंवा काहीही खाल्ल्यावर उलटी होणे ,उलटीतून रक्त येणे, सतत मोठ्याने ढेकरा किंवा सतत उचक्या येत राहणे, अचानक आपोआप वजन कमी होणे , किंवा झपाट्याने वाढत जाणे, पोटात सतत वेदना होणे
मेंदू किंवा डोळ्यांच्या कर्करोगाची लक्षणे : चक्कर येणे, दृष्टी अंधुक होणे , डोळा मिटत जाणे ,वाचा ,स्मरणशक्ती यात अचानक फरक पडणे ,फिट्स येणे (फेफरे येणे)
त्वचेच्या कर्करोगाची काही लक्षणे : त्वचेतील बदल, जसे की अस्तित्वात असलेल्या मस किंवा तीळाच्या आकारात ,आणि संख्ये मध्ये बदल होणे किंवा एखाद्या चामखिळाचा आकार वाढणे आणि त्यावर जखम तयार होणे , त्यातून रक्तस्त्राव होणे, असामान्य पुरळ, असामान्य खाज सुटणे, बरेच दिवस जखम बरी न होणे, त्वचेखाली एखादी गाठ जाणवणे
स्तन कर्करोगाची लक्षणे : स्तनामध्ये गाठ येणे जी वेदनारहित ,कडक असते आणि हलत नाही, स्तनावर त्वचेमध्ये बदल होणे, स्तनाग्रातून पाण्यासारखा स्त्राव – रक्त रक्तमिश्रित स्त्राव, स्तनाग्र आत ओढले जाणे, स्तनाची त्वचा संत्र्याच्या सालीसारखी होणे, स्तनाच्या आकारात बदल होणे, स्नानाच्या त्वचेवर खळी निर्माण होणे. (पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे १ टक्का इतके आहे .)
गर्भाशय मुखाच्या (UTERINE CERVICS) कर्करोगाची लक्षणे : असामान्य रक्तस्त्राव, अनेक दिवसांपासून योनीतून पांढऱ्या रंगाचा दह्यासारखा घट्ट,वाईट वास असणारा स्त्राव, मासिक पाळी तीन महिन्यापेक्षा जास्त काळ १५ दिवसातच येणे, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव, मोठ्या वयात शरीर संबंधांनंतर रक्तस्त्राव, सतत होणारे INFECTION
प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे : रात्रीच्या वेळी वारंवार लघवी लागणे, शौचास वारंवार अत्यंत घाई लागणे, लघवी सुरू करण्यात अडचण (संकोच), लघवी करताना ताण येणे किंवा बराच वेळ घेणे, कमकुवत प्रवाह, तुमचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे झालेले नाही असे वाटणे, लघवीत रक्त किंवा वीर्यातील रक्त.
प्रत्येक अवयवानुसार कॅन्सरची लक्षणे वेगवेगळी असतात . पण काही विशिष्ट चिन्हे आणि लक्षणे आहेत जी फक्त कॅन्सरच्या प्रकार आणि अवयव यांवर अवलंबून नसून ती कोणत्याही प्रकारात सर्वसामान्यतः अनुभवास येऊ शकतात जसे कि: माणापेक्षा वजन जास्त कमी होणे किंवा काही वेळा वाढणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, सतत चक्कर येणे, धाप लागणे, श्वासोच्छवासाला त्रास होणे आणि एका महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, पचनाच्या समस्या वारंवार जाणवणे,अपचन होणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या वारंवार जाणवणे, गिळायला त्रास होणे, सातत्याने भूक न लागणे ,किंवा उलटीची भावना होणे ,आवाजात बदल जाणवणे, वारंवार ताप येणे किंवा रात्री घाम येणे, कुठूनही रक्तस्त्राव होणे, सतत स्नायू किंवा सांधे दुखणे, जखम भरून न येणे, वारंवार इन्फेक्शन होणे.

कित्येकदा तो कर्करोग असेलच असेही नाही पण तरीही तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण सातत्याने बरेच दिवस जाणवत असल्यास तुमच्या डॉक्टरना दाखवणे गरजेचे आहे कारण लवकरात लवकर त्याचे निदान करणे अत्यावश्यक असते व उपचार करून त्यावर नियंत्रण मिळवणे चांगले असते. तुम्ही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ही सर्व लक्षणे प्रत्येकाला जाणवतीलच असं नाही आणि प्रत्येकाला याचा अनुभव अगदी सुरुवातीलाच येईल असेही नाही. अनेकवेळा त्याची तीव्रता वाढल्याशिवाय लक्षणे लक्षात येत नाहीत. खरंतर, अनेकांना कोणतीही लक्षणे अजिबात जाणवतही नाहीत,
काही विशेष तपासण्या केल्यानंतरच कॅन्सर असल्याचे लक्षात येते. यात महत्वाचा मुद्दा असा की कोणत्याही अगदी क्षुल्लक लक्षणांकडे देखील दुर्लक्ष होता कामा नये.

डॉ.क्षमा वैरागी
सायको ऑन्कोलॉजिस्ट,
संशोधन सल्लागार,
टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल, मुंबई

Leave a comment