श्री. विजय वैरागी , कीर्ती दामले
कळसूत्री बाहुल्यांचा खेळ

अद्रुश्य हातातील कठपुतली जनता
शक्तीच्या छायेत खेळणारी सत्ता
सामर्थ्याच्या दिशेने न्यायाचा कल
सामान्यांच्या नजरेत असहायतेची सल
प्रामाणिक प्रयत्नांना स्वप्नांची धूळ
हपापलेल्या बाहुबलींना सामान्यांचा शूळ
अधिकाराच्या वचनांना शब्दांचीच झुल
नैतिक हक्कांना ठरवती खुळ
पण आशेची पालवी मनात मांडते ठाण
बदलाची बीजे आत रोवली जातील ठाम
येईल तो दिवस उगवेल नवी पहाट
जेथे विवेकाची पुन्हा रुजेल वहिवाट
- श्री. विजय वैरागी

अभया / निर्भया ?

कधी म्हणा अभया,
कधी म्हणा निर्भया,
बलात्कार होती लीलया,
न ठेवता तमा कशाचिया !
नाजूक, सुंदर, पापा की परी,
वयात आली की वाटे बेडी,
झाकून ठेवावी का ती नारी ?
कि उडावी ती फक्त तीरावरी ?
काय घालावे, कसे घालावे,
कसे हसावे, कसे बसावे,
कसे दिसावे, कसे असावे,
पाळून नियम सारे, असे का घडावे?
आकाश असावे तिचे मर्यादित,
बसली पाहिजे अपेक्षांच्या यादीत,
नांदली पाहिजे समाजाच्या चौकटीत,
अन्यथा कोणी ना विचारिती !
उडू दे तिच्या पंखांना मुक्त,
का असावे जीवनभययुक्त ?
मूठभर होऊ लागले उन्मत्त,
करिती तिचे आयुष्य अस्ताव्यस्त !
न त्याची सरकारला खंत,
कालांतराने समाजही शांत,
उठे हृदयात सतत बंड,
कधी होईल अन्यायाचा अंत?
नष्ट होवो हीन पशुता,
विकृति नि क्रूरता,
मनामनात जागो समता,
प्रस्थापित होवो खरी मानवता!
- कीर्ती दामले


Leave a comment