-कु. शताक्षी रिसबुड
नमस्कार ! मी, नाशिकमध्ये राहणारी कु. शताक्षी हेमंत रिसबुड. मला तुमच्यासोबत, आर्थिक फसवणूकीच्या बाबतीत मला आलेला एक अनुभव शेअर करायचा आहे.

२३ जुलै २०२४ रोजी, मला राहुल शर्मा या नावाने फोन आला. मी फोन उचलल्यानंतर राहुल बोलू लागला. “नमस्कार. मी LIC मधुन बोलतो आहे. हेमंत सरांच्या नावे एक रु. १२,००० चे पेमेंट करायचे आहे. त्यांनी नुकताच तुमचा नंबर दिलेला आहे आणि तुमच्याशी बोलायला सांगितले आहे. तुमचा हा मोबाईल नंबर गुगल पे साठी रजिस्टर आहे का ? मी पैसे ट्रान्सफर करतो. “
खरे तर, माझे वडिल श्री. हेमंत रिसबुड – हे २०२० मध्येच कोव्हिड कालावधीत वारलेले आहेत. त्यामुळे मी सावध झाले. बोलतांना राहुलने माझी सगळी चौकशी केली. माझा ईमेल वगैरे सगळे एकदम बरोबर सांगून पेमेंट क्रेडिट केल्याचे सांगितले. लगोलग मला एक साधा टेक्स्ट मेसेज आला. त्यावर रु. १०, ००० जमा झाले आहेत असा मजकूर होता. माझ्या लक्षात आले की हा मेसेज मला माझ्या नेहेमीच्या बॅंकेकडून आला नव्हता. एका अनोळखी नंबर वरुन तो आला होता. राहुलचा पुन्हा फोन आला. “मॅडम, उरलेले रु. २, ००० ट्रान्सफर करण्याच्या प्रयत्नात माझ्याकडून चुकुन रु. २०, ००० ट्रान्सफर झाले आहेत. तेव्हा आता तुम्ही मला रु. १८, ००० परत ट्रान्सफर करा.मी QR कोड पाठवतो आहे. “. लगेच त्याचा QR कोड चा मेसेजही आला.
काही महिन्यांपूर्वीच मला माझ्या मामांनी फोन करून ,अशी हुबेहूब फसवणूक माझ्या चुलत बहीणीच्या बाबतीत कशी झाली ते सांगितले होते. माझ्या बहिणीचे पैसे त्यावेळी लुटले गेले होते. राहुलचा फोन, पैसे क्रेडिट झाल्याचे दर्शविणारा बनावट मेसेज यावरून मला ते सगळे आठवले.आणि ‘वडिलांनी फोन करायला सांगितले आहे’, असे राहुल म्हणताच माझ्या लक्षात आले होते की हा फ्रॅाड कॅाल आहे. मग मी तो नम्बर ब्लॉक केला आणि राहुलने सांगितलेल्या पुढील स्टेप्स काही घेतल्या नाहीत.
वाचकहो, हा अनुभव तुमच्यासॊबत शेअर करण्याचे कारणच हे वाटते की असे फोन तुम्हालाही येउ शकतात. तेव्हा कृपया दक्षता घ्या, अशा कॅालला बळी पडु नका आणि आपल्या कष्टार्जित धनाचे रक्षण करा.

-कु. शताक्षी रिसबुड

Leave a comment