संत तुकाराम यांचा अभंग आणि त्याचा भावार्थ.

येऊ घातलेल्या आषाढी एकादशी निमित्त, महाराष्ट्रातील संपन्न अशा संतपरंपरेतील, विठ्ठलावरील रचना वाचत होते. जसजशा या रचना वाचित गेले तसतसा त्यांच्या रचनानाकारांविषयी (ज्ञाना, नाथा, नामा, तुका , चोखा, जना इ.) आदर दुणावत गेला. लौकिक अर्थाचे शिक्षण नाही, घरातील सांपत्तिक परिस्थिती हलाखीची, जातीयव्यवस्थेमुळे समाजातून मिळणारा तिरस्कार.. अशा दुःखी-कष्टी अवस्थेतेतही, केवळ विठ्ठल भक्तीनेच या सर्वांचे जीवन तारून नेलेले दिसते. आणि अमाप अशा विठ्ठल भक्तीनेच त्यांच्या जीवनाला संतपद लाभलेले दिसते. म्हणूनच त्यांच्या रचनांनाही अनोखी उंची लाभू शकली आहे.
प्रभू विठ्ठल, जो जगातील सर्व भाव-बंधनांपासून मुक्त आहे, जो सर्व जगाकडे समसमान भावनेने पाहू शकतो, ज्याचे मन निरीच्छ आहे आणि ज्याच्या मनात, मुखावर शांत, स्निग्ध, तृप्त भाव विलसत आहेत अशा विठ्ठलाचा संत तुकारामांना हेवा वाटतो आहे ! आणि आपल्या मनातील भाव ते पुढील अभंगातून व्यक्त करीत आहेत.
मला आवडलेला संत तुकाराम यांचा एक अभंग आणि त्याचा मला उमजलेला भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न !
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें ।
कामक्रोध केलें घर रीतें ॥४॥
अर्थात संत तुकाराम म्हणत आहेत..

“मला विठ्ठलाचे नाम घ्यायचे आहे ! मला सतत त्याला पाहण्याची इच्छा आहे ! प्रभू विठ्ठलाच्या स्वरूपात अशी काही ऊर्जा आहे की मला स्वतःलाच विठ्ठलरूप घ्यावेसे वाटते आहे. गतकाळात मी अनुभवले की या जगात, संसाररूपी भवसागरात माझे मन हे मोह, माया, क्रोध, लोभ आदी भावनांनी भरकटलेले, सैरभैर झालेले होते. त्यामुळे मनाला संतुलित, सम्यक अवस्थेत परतण्याची इच्छा होत नव्हती. पण हे देवा तुझ्या दर्शनाने, भक्तीने माझ्या मनातील, आचार-विचारातील सांसारिक बंधनांच्या गाठी आता सुटल्या आहेत. तुझ्या भक्तीच्या गहिवरातच आता मला शांतपणे, मनाच्या निरीच्छ अवस्थेने तुला भेटता येते आहे. तुला पाहताच, माझ्या मनातील इच्छा, आकांक्षा , क्रोध आदी बंधनाच्या गाठी गळून पडल्या आहेत आणि आता माझे संपूर्ण अस्तित्व विठ्ठलाने भरलेले आहे, भारलेले आहे, विठ्ठलासम शांत, स्निग्ध, तृप्त झाले आहे. “
किती सुंदर रचना आणि त्याचा किती सखोल अर्थ ! मनाच्या त्या विठ्ठलरुपी अवस्थेत पोहचल्यावरच, मनाला हा अनुभव घेता असेल !
तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनांना, आचार-विचारांना , जीवनाला अशीच सम्यक, सिद्ध, समाधानी, तृप्त अवस्था प्राप्त होवो.. या आजच्या आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा !!
डॉ. रुपाली दीपक कुलकर्णी,
9011896681
केतकी माटेगावकर या गुणी अभिनेत्री-गायिकेने हा अभंग अतिशय सुंदर सादर केला आहे. लिंक पुढीलप्रमाणे
https://www.youtube.com/watch?v=sqrew1ABIC4

Leave a comment