।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


प्रवास .. मानवकेंद्रीत ते मानव विरहित व्यवहारांचा

एक आढावा

असे म्हणतात  की ही सृष्टी निर्माण झाली ती एका ओमकारापासून. वर्षानुवर्ष कालचक्र फिरते आहे आणि सृष्टी तिच्या मायेचा खेळ खेळते आहे.  ह्या खेळात करोडो जीव, जंतू,वृक्ष,जलचर एकत्रित रित्या रहातात आहे- ह्यात सगळ्यात बुद्धिवान प्राणी म्हणजे माणूस.  माणसाने आजतागायत नवनवीन शोध लावून जिवन सुख, सोयी आणि समृद्धीचे केले आहे. ही प्रगती आज थक्क करून सोडणारी आहे- वर्षानुवर्ष माणसाने संशोधन, अभ्यास  करून वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आणि आज आपल्याला हा दिवस दिसतो आहे.

साधारण १९४०-१९५० च्या दशकात कॉम्प्युटर नावाच्या यंत्राचा जन्म  झाला. एक कॉम्प्युटर म्हणजे एका मोठ्या खोली एवढे अजस्त्र मशिन. त्यात गणिती  आकडेमोड , समीकरणे, अल्गोरिदम  सोडविणे  असे  मानवाला मदत करणारे काम करणे सोपे झाले. पण हे संशोधनाच्या पातळीवरच होते.  ह्याच काळात  जन्म झाला तो बॅंकांचा आणि हाच तो काळ जेंव्हा सरकारने बाजारात नोटा आणल्या.   कालांतराने व्यवहार वैयक्तिक न रहाता त्याला  व्यावसायिकता आली आणि त्या व्यावसायिकतेची रूपांतर लेखी स्वरूपात आले.  मग लेखी व्यवहार मानवाच्या उपस्थितीत कागदावर व्हायला लागले. 

१९७०-२००० ह्या काळामधे  उद्योगांना अर्थसहाय्य, अर्थठेवी, घरासाठी कर्ज ह्यासाठी पर्याय म्हणून बॅंकांचे जाळे मोठ्या शहरात  पसरायला लागले. बॅंकेत जाऊन पैसे काढणे, भरणे, हस्तांतर करणे हे व्यवहार कागदावर होत होते.  व्यावसायिक चक्र तरीही सुमार वेगात फिरत होते.  पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी मनी ऑर्डर किंवा चेक द्यावे लागत असे.  दिवाळीच्या दिवसात आईला मामाकडून भाऊबीज म्हणून मनी ऑर्डर आली की आईचा आनंद गगनात मावेनासा होत असे.  औद्योगिकरण सुद्धा बेताचे होते.  किरकोळ खरेदी असो, वाहन खरेदी असो, घराचे व्यवहार असो वा देशांतर्गत किंवा देशाबाहेरील व्यवहार असोत, सगळ्या व्यवहारात खरेदीदार आणि विक्री करणारा हे  समोरासमोर येवून कागदपत्रांवर व्यवहार करत असे. 

मला आठवतं,  बजाज स्कूटर किंवा व्हेस्पा मिळण्यासाठी लोकांना एक एक वर्ष ताटकळत रहावे लागे.  कारण उत्पादन हे मर्यादित होते.  लोकांजवळ कमी पैसा होता.  काळानूसार सेमीकंडक्टर उद्योगांनी भरारी घेतली आणि बघता बघता २००० सालापर्यंत मोठ्या मोठ्या ऑफिसेस मधे लहान आकारातील पण वेगाने काम करणारे  कॉम्प्युटर  दिसू लागले.  हया कॉम्प्युटरने  क्रांती केली आणि  बॅंकेचा डेटा आणि बॅंकेचे अंतर्गत व्यवहार डिजीटल झाले-  

जसे जसे जागतिकीकरण होत गेले, तसे तसे व्यवहार हे देशांतर्गत न रहाता देशाबाहेर होवू लागले.  विदेशी बॅंका, विदेशी उपकरणे, विदेशी कपडे ह्यांचे शिरकाव झाला आणि तेंव्हाच नवनवीन  टेकनोलाॅजीचा शोध लागला कारण ती काळाची गरज बनली.  

Information Technology ही वेगळी अभियांत्रिकी शाखा झाली आणि सुरवात झाली ती साॅफ्टवेअर बनविण्याची.  सगळ्या उद्योगात कॉम्प्युटरने शिरकाव केला आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविली.  परिणाम असा झाला की त्याने उद्योगातील कागदी व्यवहार इलेक्ट्रॉनिक केले.  सारेच व्यवहार एकदम जलद गतीने व्हायला लागले. कंपन्यांमधे, बॅन्कामधे हाॅटलाईन नावाची  सुविधा उपलब्ध झाली आणि देशाबाहेरील अधिकाधीक संवाद  ह्या हाॅटलाईनच्या मदतीने होवू  लागले. त्याबरोबरच प्रगत राष्ट्रात सेवा क्षेत्रात मोठी क्रांती झाली- इंटरनेटचा जन्म झाला आणि ह्याचा उपयोग व्यवहार करण्यास होवू लागला.   हार्डवेअर, साॅफ्टवेअरच्या किमती आवाक्यात यायला लागल्या.  Business to Business, Business to Customer, Customer to Customer  असे व्यवहार आता सर्रास इंटरनेटच्या माध्यमातून व्हायला लागले कारण Communication  नेटवर्क उपलब्ध झाले.  उद्योगांमधे सुद्धा क्रांती व्हायला लागली.  जी  कामे करताना  मनुष्याला  धोका आहे, जी कामे एकाच पद्धतीने वारंवार करावी लागतात  असे काम करण्यास रोबोट तयार करण्यात आले.  ट्रकमधून कंपनीत माल आला की तो खाली उतरवून गोडाऊन मध्ये व्यवस्थित नामांकन करून विशिष्ट जागी बसविण्यासाठी रोबोट तयार झालेत.  मॅन्युफॅक्चरिंग लाईनवर मानवी हस्तक्षेप कमी व्हायला लागला. रिटेल क्षेत्रात सॉर्टिंग, पॅकिंग यंत्राच्या मदतीने व्हायला लागले- एकंदरीत अर्थ चक्राने वेग घेतला होता. माणसांजवळ  पैसा खेळायला लागला आणि घड्याळ्यावर  धावणारी माणसे शहरांमधे मोठ्या प्रमाणात दिसायला लागली.  त्यांच्या सुविधांसाठी बॅंकेने ATM मशिन्स आणले आणि ते ग्राहकांसाठी  सोयीचे तसेच बॅंकेला सोयीचे बनले. आता ग्राहकांना पैसे कुठूनही आणि कधीही काढता यायला लागले. इंटरनेट सेवा जशी आणखी प्रगत झाली तसे कॉम्प्युटरवर लोक इंटरनेट बॅंकिंग करू लागलेत.  आता कागदावरचे व्यवहार अगदी कमी  झालेत.  ऑनलाईन व्यवहार आता सोयीचे झालेत.  रिटेल कंपन्यांनी आता e-business / ऑनलाईन बिझनेस सुरू केला आणि दुकानात जावून खरेदी करणे हा प्रकार  बंद होवू लागला. त्यात शोध लागला तो स्मार्ट फोनचा आणि त्याने लोकांची जीवन जगण्याची पद्धत बदलून टाकली.  एका स्मार्ट फोन मुळे सारे जग व्हर्च्युअल झाले. विज बिल, टेलिफोन बील, टिकिट काढण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या मोठ्या रांगा बंद झाल्यात. त्यात सोशल मिडियाने धिंगाणा घातला. हवे ते, हवे त्यावेळी लोकांना सेवा पूरविणाऱ्या कंपन्या निर्माण झाल्या आणि लोकांनी त्यांना उचलून धरले.  ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन शाॅपिंग,  ऑनलाईन बॅंकिंग, ऑनलाईन ट्रेडिंग आता एका स्मार्ट फोन वर होऊ लागले.  इथपर्यंत माणूस दृष्टीस पडत होता.

जसा जसा व्यवहार डिजीटल होत गेला तसा तसा डेटा मोठा मोठा होत गेला.  ह्या डेटाचा उपयोग ग्राहकांसाठी कसा करावा ह्यासाठी मोठ्या कंपन्या सज्ज झाल्यात आणि डेटा हा फक्त डेटा न रहाता तो माहिती आणि ज्ञान ह्यात रूपांतरीत होत गेला.  त्याचाच परिणाम म्हणून आपण वर्षभर ऑनलाईन शाॅपिंग केले की आपला डेटा कंपनीकडे जाणार. आपल्या खरेदीनुसार, आपल्या वयानुसार, आपल्या  भौगोलिक रहाण्याच्या ठिकाणानुसार आपल्याला अलर्ट येणे सुरू होतात. जसे की- “तुम्ही  स्मार्ट फोन खरेदी केला-.तर तुम्ही आता टॅबलेट खरेदी करू शकता”.  म्हणजे हुशारीने तुमची आवड जाणायची आणि तुम्हाला नवीन वस्तू घेण्यास प्रवृत्त करायचे.  हेच ते Artificial Intelligence (AI).    ह्याचा वापर काही मर्यादेपर्यंत नक्कीच चांगला आहे.  माणसाची बुद्धी किती उंचावर गेली आहे हे त्याचे प्रमाण आहे. पण त्याचा उपयोग सगळ्याच क्षेत्रात होत गेला तर मात्र ते चिंतेचे एक कारण बनू शकते.  आज पाश्चात्य देशात मोठमोठ्या हाॅटेल्स मधे सेवा देणारी माणसं दिसेनाशी  झाली  आहेत.  छोटे  छोटे BOTS ( इंटेलीजेन्ट  यंत्र) ही सेवा  कामे करतात.  जसे की हाॅटेलच्या  १५ व्या माळ्यावर खोली नंबर ४ मधे कोणी नाश्ता सांगितला तर तो टेलिफोन वर सांगावा लागतो.  हा नाश्ता एकदा बनला की तो रूम मधे नेण्यासाठी हे मानव विरहित यंत्र रिमोटनी आपले रूम नाॅक  करणार आणि तो नाश्ता, नाश्ता पॉईंटवर ठेवणार. इलाॅन मस्क ह्यानी निर्माण केलेली TESLA  ह्या कंपनीची ड्राव्हरलेस गाडी म्हणजे मानव विरहीत ड्रायव्हिंग. ड्रोन डिलीव्हरी, अलेक्सा, बाॅट्स, रोबोट्स, रोबोटीक सर्जरी, ही दृश्य स्वरूपातील यंत्र  मानवाचे दैनंदिन काम करत आहे आणि व्यवहार  मानव विरहित होत चालले आहे. AI च्या मदतीने इंटेलीजेन्ट खेळ बनवून लहान मुलांनाआभासी जगात खेळविण्याचे प्रकार आज भारतात सुद्धा आपण पाहतो आहे. शिक्षण पद्धती, जिच्यामधे शिक्षक आणि मुले एकमेकांसमोर बसून शिकतात ती आता लवकरच लुप्त होत चालली आहे. व्हर्च्युअल क्लासरूम पद्धतीत रोबोट मुलांना शिकविणार. ह्यात ना मानवी संबंध, ना मानवी भावना, ना परस्परावलंबन. ह्याचा समाजावर काय परिणाम होणार ह्याचा मोठ्या प्रमाण सोशल सांईन्टिस्ट अभ्यास करत आहे.

आपण आशा करू की ह्या मधे आपल्याला सुवर्ण मध्य सापडेल.  नाहीतर खरा मानवा चालता बोलता भावना विरहित यंत्र व्हायला उशीर लागणार नाही.

डाॅ. सौ. मृणालिनी दोडके, IT Consultant,

mrunalinidodkey@gmail.com


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment