
“नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन “ हा श्री. शंतनु गुणे, नर्मदा परिक्रमावासी यांचे ‘दृक-श्राव्य अनुभवकथन’ करणारा कार्यक्रम ३१ मे २०२४ , सायं ६:१५ वाजता, विशाखा हॉल , कुसुमाग्रज स्मारक, नाशिक येथे संपन्न झाला !! या कार्यक्रमास जिज्ञासूंनी उदंड प्रतिसाद दिला . श्री. गुणे यांनी व्यक्त केलेल्या अतिशय भावपूर्ण आणि प्रवाही अशा अनुभूतीमधून श्रोत्यानाही नर्मदा परिक्रमा करण्यामागील खरे गमक समजले !! या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या श्री. शिशीर सिंदेकर, यांनी याविषयी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात …
“जगण्याचा सूर गवसलेला शंतनू “
शास्त्रीय गाणं गात असतांना अचानक गाणाऱ्याच्या गळ्यातून निघालेली एखादी सुंदर जागा श्रोत्याला सापडते आणि तो सहजगत्या म्हणतो, दाद देतो, “वाह क्या बात है!” आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अशा जागा शंतनूला सापडत गेल्या, त्यात त्याला त्याचा आनंद,सुखं सापडत गेलं,आणि त्याचं आयुष्य समृद्ध, कृतार्थ झालं.
आपण शंतनूला ओळखतो ते म्हणजे पेठे हायस्कुलचा विद्यार्थी म्हणून ! बेंच वाजविण्यापासून ते बोंगो,कोंगो आणि मग नाल,मृदुंग,तबल्यापर्यंत सर्व ताल वाद्य वाजविण्यात अखंड गुंग असलेला. इंजिनिअरिंगच्या शिक्षणानंतर क्रॉम्प्टन मधला शंतनू. तालाची नेमकी जाण असणारा शंतनू ठरवून श्री.थत्ते या थोर गुरूंच्या मार्गदर्शनात शास्त्रीय संगीतात पारंगत झाला. या प्रवासात त्याला त्याच्या गळ्यातल्या सूरांची ओळख होत होती. मा.श्री. भीष्मराज बाम सरांच्या सहवासात आल्यानंतर त्याच्या आयुष्यात पूर्ण फरक पडलेला जाणवला. त्यातूनच मुलांच्या,युवकांच्या मानसिक सामर्थ्यात सकारात्मक बदल घडवून आणता येतो,या विश्वासाने त्याने ‘जागर मनाचा’ हा उपक्रम सुरु केला. कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंग कोर्सेस घेतले. अनेक विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी समुपदेशक म्हणून काम सुरु केले. हळूच तो साहित्याच्या प्रांतात आला. त्याने कविता लिहिल्या. मा.साहित्यिका अरुणाताई ढेरे यांच्या हस्ते त्याचा ‘अंतर्नाद’ हा काव्य संग्रह प्रकाशित झाला.
या सर्व नॉर्मल जीवन चौकटीतून बाहेर पडून पुन्हा आपल्या मनाचं सामर्थ्य तपासून सिद्ध करण्यासाठी तो नर्मदा परिक्रमेला निघाला. तसा तो बुद्धीवादी,विवेकवादी,देव धर्माचं स्तोम न माजवणारा अचानक यामार्गाकडे कसा वळू शकतो हे एक कोडंच होतं . या परिक्रमेचा अनुभव त्याच्याकडून ऐकतांना अनेक वेगळ्या गोष्टी,अनुभूती जाणवत होत्या. या परिक्रमेत स्वतः ची ओळख विसरणे ही पहिली पायरी असते. ‘सम बडी टू नो बडी’ आणि शेवटच्या पायरीवर व्यक्ती ‘समष्टी’ च्या पातळीवर पोहचते. हा “नो बडी टू एव्हरीबडी ” हा प्रवास त्याने सुंदर पद्धतीने उलगडत नेला. अत्यंत खडतर प्रवासात वेळोवेळी येणाऱ्या संकटाना सामोरं जात असतांना नर्मदा माता वेगवेगळ्या व्यक्ती,निसर्ग,पर्यावरणाच्या माध्यमातून नकळत दर्शन देते,आणि मार्गदर्शन करीत आशीर्वाद देत तारुन नेते,हे दृश्य त्याच्या कथनातून आपल्या डोळ्यासमोर उभे रहात होते. नर्मदेच्या काठावर असलेल्या “हर कंकर में शंकर हैं ‘ याचा प्रत्यय लोकांना त्याच्या वक्तृत्व शैलीने अनुभवास येत होता.

तो उत्कृष्ट संवादक आहे, चांगला परफॉर्मर आहे, सहज बोलणं, चित्त खिळवून ठेवणाऱ्या गोष्टी, आणि दृक श्राव्य माध्यमाचा योग्य वापर यामुळे,त्याचे अनुभव कथन अप्रतिम सादर झाले. नर्मदा परिक्रमेतून देवावर श्रद्धा असो अथवा नसो, आयुष्याच्या प्रवासात येणाऱ्या अनिश्चिततेला ,त्यातून निर्माण आव्हानांना,अडचणींना कसे सामोरे जायचे याचे मार्गदर्शन शंतनू कडून या नर्मदा परिक्रमेच्या अनुभव कथन प्रसंगी नकळत होत होते. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉल पूर्ण भरला होता, बाहेरही लोक खुर्च्या टाकून बसलेले होते. त्यातलया बहुतेक श्रोत्यांना ,त्याचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकायचे होते. बोलण्याच्या ओघात साक्षात नर्मदा मैया वेगळ्या रूपात भेटते,असे प्रसंग तो जेंव्हा सांगायचा, तेंव्हा एखादा शास्त्रीय गायक समेवर आल्या नंतर श्रोते जशी दाद देतात,तसा प्रतिसाद लोक आपोआप देत होते. त्याचा हा प्रवास नक्कीच नास्तिकते कडून श्रद्धापूर्ण आस्तिकतेकडे नेणारा होता.
मानसिक सामर्थ्य वाढवणारी त्याची परिक्रमा त्याला न संपणारा आनंद देत गेली, त्याचं आयुष्य समृद्ध करणारे अनुभव देत गेली. या वाटेवरचे अनुभव वैयक्तिक असतात, पण ते आपल्यासारख्यांसाठी प्रेरणादायक ठरतात. शंतनूने त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या वाटांवरचे वेगवेगळे पर्याय शोधले,त्या प्रत्येक जागेवर त्याने आनंद शोधला, आणि त्या प्रत्येक जागेवर त्याला त्याच्या “जगण्याचा सूर” गवसला. त्याच्या पुढच्या मार्गक्रमणा साठी त्याला आपल्या सर्वांतर्फे अनेक अनेक शुभेच्छा.

श्री. शिशीर सिंदेकर,
9890207692
या हा कार्यक्रम संपन्न झाल्यावर श्री. गुणे यांच्या मनातले भाव त्यांनी पुढील शब्दात आहेत !!
“माईने माझ्या ओंजळीत दिलेला प्रसाद ,मला इतक्या जणांना वाटतां आला हे माझे भाग्य ! माईची माझा असाच तिचे माध्यम म्हणून स्विकार करावा हीच तिच्या चरणांशी प्रार्थना ! नर्मदे हर ! “
तुडुंबला डोह,
ओसंडले काठ,
मिळे नर्मदामाईचा,
ओंजळीत प्रसाद !
शेकडो मने ती,
झाली शुद्ध पुलकित,
मी माध्यम मात्र,
माईचा कृपावंत !
हा खळाळ माझ्यातला,
ऐसाच खळाळत रहावा,
ओंजळीतला प्रसाद,
मुक्त वाटतां यावा !
आहे मला कल्पना,
आहे मी पामर,
माईच्या परीस स्पर्शानी,
होत आहे ओहोळाचा सागर !

- श्री. शंतनु गुणे

Leave a comment