नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन
आनंद म्हणजे , जीवनाला दिलेल्या डोळस प्रतिसादामुळे आपल्यातीलच एक अनोख्या पाकळीचं आपसुक उमलणं आणि तिच्या विश्रब्ध सुंगंधात आपणच हरवून जाणं !

दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केलेला परमअलौकिक नर्मदामाईच्या दिव्य परिक्रमेचा संकल्प बरोबर चार महिन्यांच्या पदभ्रमणाने पूर्णत्वास गेला आहे याचे कारण ज्याक्षणी मी हा संकल्प केला त्याक्षणापासून
नर्मदामाईने माझ्या कायेला कवचकुंडले दिली , प्रेमाने माझे बोट पकडून मनाला निर्भयता देऊन आश्वस्त केले आणि नर्मदामाईवर अनन्यसाधारण भक्ती करणाऱ्या विराट समाजपुरूषाने माझ्यावर अन्नपूर्णेचे – निवाऱ्याचे विनाअट छत्र धरले . त्याचबरोबर सृष्टीतली व शरीरातली पंचमहाभूते माझे सखेसोबती झाले , दररोजचा उगवतीचा सूर्यदेव माझा प्रेरणास्त्रोत झाला आणि मावळतीचा सूर्यदेव माझ्या वाटचालीचा साक्षीदार झाला . इतक्या जणांकडून इतके सारे नर्मदामाई माझ्यासाठी करवून घेत असताना माझ्यासाठी तिने फक्त श्रद्धापूर्वक पाऊल उचलणे एवढेच काम शिल्लक ठेवले होते . या पावलांमधली उर्जाही तीच झाली होती . या संकल्पामागची बुद्धीही तिचीच . हे सारे तिनेच घडवून आणल्यामुळे माझ्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीकडून हे असाधारण तप होऊ शकले . यात माझे कर्तृत्व काहीही नाही . सारी तिचीच कृपा . यात माझ्यासाठी जर काही उपलब्धी असेल तर मी माईचा कृपापात्र , प्रसादपात्र आहे ही जीवनसमृद्ध करणारी जाणीव .
मागून मिळते ती भिक्षा व न मागता मिळतो तो प्रसाद . पण या दोन्हीसाठी पात्र असावे लागते . या परिक्रमेने मी भिक्षेसाठी व प्रसादासाठी पात्र आहे हे सांगितले व माझ्या जीवनाचे सार्थक केले .
या पदयात्रेत मी जी पावले टाकत होतो या प्रत्येक पावलांच्या मागे नर्मदामाईच्या शिवाय साऱ्या सृष्टीची साथ , अंबाबाई व पल्लिनाथ या कुलदेवतांचे व गुरूसमान जेष्ठांचे आशिर्वाद , आई तात्यांची पुण्याई , तुम्हा सर्व संवेदनक्षम व प्रगल्भ कुटुंबियांचा माझ्या संकल्पातला मनःपूर्वक सहभाग , तुम्हासर्व जिवश्च मित्र मैत्रिणींच्या मनापासूनच्या शुभेच्छा आणि अनंत ज्ञात अज्ञात लोकांच्या सद्भावना होत्या याची कृतज्ञ जाणीव मला आहे .
जेव्हा मी माझ्या जवळचे नर्मदामाईचे जल ओमकारेश्वराला अर्पण करून या संकल्पाची सांगता केली त्यावेळी मनात अनेक संमिश्र भावना दाटल्या.
एका अनन्यसाधारण संकल्पाची पूर्तता होत आहे म्हणून ते कमालीचे समाधानी , शांत, आनंदी व कृतज्ञ आहे . पण त्याचवेळी हा दिव्य अनुभव देणाऱ्या नर्मदामाईच्या कुशीपासून दूर जाणार , तिला सर्वस्व मानणाऱ्या , तिची अन्योन्य भक्ती करणाऱ्या कष्टकरी सश्रध्द , सरळ , समाधानी जगाला मी दुरावणार ,माईच्या भोवतीच्या विविधतेने नटलेल्या सृष्टीच्या विराट शुध्द प्रेरक रूपाला मी आता पारखा होणार या भावनेने ते विलक्षण हुरहुर पण अनुभवत होते.
आता इथून पुढे गावागावातल्या मंदिरांतून पहाटेच सुरू होणाऱ्या काकड आरतीचा गजर ऐकू येणार नाही की तिथे सुरू असणारे अखंड रामचरित मानस , तुलसीरामायण , रामकथा रामभजन कानावर पडणार नाही . आता घराघरांतून , झोपडी झोपडीतून ऐकू येणारी उत्स्फूर् नर्मदे ऽऽऽऽऽ हर ही पुकार कानी पडणार नाही किंवा दीडदोन वर्षांच्या चिमुरड्यांपासून ते जराजर वृध्दांपर्यंत नर्मदे हर म्हणून नमस्कार करणारे दृष्टीस पडणार नाहीत . डोंगरदऱ्यांतून जाताना मूकपणे हात जोडून भाव व्यक्त करणारे मेंढपाळ , गायीगुरेम्हशी हाकणारे गुराखी , शेतात राबणारे शेतकरी आता दिसणार नाहीत. ती प्रेमादराने ओथंबलेली दृष्टी , पायांना स्पर्श करून त्या रांगड्या हातांची आपले हात हातात घेण्यासाठीची आतूरता आता अनुभवायला मिळणार नाही . हिरव्यागार शेतात हरवलेल्या , ओबडधोबड दगडाधुळीने भरलेल्या , माईच्या मऊशार वाळूत बुडालेल्या, गोलगोल दगडगोट्यातून , चिखलांतून , कडेकपाऱ्यांतून , डोंगरमाथ्यावरून जाणाऱ्या हजारो साधकांच्या पावलांनी पुनीत झालेल्या पायवाटा आता दृष्टीआड होतील .
आता सूर्योदयाबरोबर आपसुकच मुखी गायत्रीमंत्र येण्यात व सुर्यास्ताबरोबर दिवसभराचे कष्ट वेदना कथन करण्यात खंड पडेल . आता रणरणत्या उन्हात उभा कातळ चढताना लागलेल्या धापेला शांत करताना, श्वासोउछ्वासाच्या उधाणलेल्या लयी बरोबर नर्मदे हरचा जप आपसुक सुरू होणार नाही . घामाने चिंब झालेल्या शरीराला थंडावा देत आश्वस्त करणारी वाऱ्याची हलकीशी झुळूकेची वा लिंबाच्या झाडाची सावलीची गरज आता पडणार नाही . तळपत्या उन्हात सरळसोट उभा घाट चढून आल्यावर आजुबाजूला कुणीही नसताना दूरच्या झोपडीतून “ आओ बाबाजी , ठंडा पानी पिओ और थोडा विश्राम करो “ अशी हाक ऐकू येणार नाही वा एखाद्या झोपडीच्या बाहेर त्या रणरणत्या उन्हात अनवाणी पायांनी हसतमुखाने हातात थंडगार पाण्याचा लोटा घेऊन उभी असलेली इवलीशी चिमुरडी दिसणार नाही …असे विशुद्धतेत , माईच्या भक्तीप्रेमात चिंब भिजलेले जग आता दुरावणार … आणि सगळ्यात जास्त हुरहुर लावणारी गोष्ट म्हणजे नर्मदामाईची असंख्य भावविभोर भावोत्कट रूपे , तिचा चैतन्यदायी खळाळ , तिचे सत्शील पावित्र्य व शुद्धत्व आकंठ प्राशन करत तिच्या काठावरून “नर्मदे हर” चा जप करत एका लयीत पावलं टाकत रहाणं , तिच्या दर्शनाने तृप्त होत रहाणं , आतून शांत होत जाणं , आपल्यातल्या कमतरतांना स्वच्छपणे सामोरे जात स्विकारणं, आपल्या अंतस्थ वेदनांचे व्रण तिच्या निर्मळतेला निरखत भरून काढणं आता दुरावणार !
पण या पावणेचार महिन्यांत जी शिदोरी तिने माझ्या झोळीत भरभरून दिली आहे ते ज्ञान , ते शहाणपण , जीवनाकडे बघण्याचा , त्याला जाणत जाणत, त्यातले मर्म जगत जगत , जीवनाचे सजवलेले ,मढवलेले डबके होऊ न देता , त्याला सतत खळाळते ठेवत स्वतःतल्या इश्वरीतत्वाच्या सन्निध जात रहाण्याचा , मनुष्यत्व उन्नत करण्याचा दृष्टिकोन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबरोबर राहील .
शेवटच्या श्वासाबरोबर जे माझ्यासोबत येणार आहे ते मला माईने ओसंडून दिले आहे . जे इथेच राहणार त्यातून सुटत जाण्याचे धडेही तिने माझ्याकडून छान गिरवून घेतलेआहेत !
माझ्यासारख्या एका सर्वसामान्य जीवाला सर्वार्थाने समृद्ध व संजीव करण्यासाठी , जीवनाचे सारे सार माझ्या पदरात टाकून ते माझ्या जगण्यातून पाझरावे म्हणून माईने केलेली केवढी ही विराट व्यवस्था !
या चार महिन्यांत अखंड वहाणाऱ्या जीवनाच्या सच्च्या दर्शनाने, माईच्या अथांग प्रेमाच्या अनुभवाने जाणिवांचा परीघ असीम होत चालला आहे आणि त्या परीघाला घट्ट धरून ठेवणारे अहम् चे केंद्र सैलावत चालले आहे . “मी व माझे” या दोन भ्रामक शब्दांतला भ्रम आकळून तो पिकल्या पानांप्रमाणे गळून पडत आहे . इश्यावास्यं इदं सर्वम” मंत्रातले सत्य फक्त बुद्धीच्या तवंगावर न रहाता ते पेशीपेशीत रुजत आहे .
“चिदानंद रूपं शिवोहम् शिवोहम्” च्या अनुभूतीने चिदाकाश हळूहळू प्रकाशत आहे .
नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर !
– शंतनु गुणे (परिक्रमावासी)
तळटीप : सदर परिक्रमेचा शब्दानुभव घेऊयात , ही परिक्रमा करणाऱ्या श्री. शंतनू गुणे यांच्याकडून !
कार्यक्रम: ३४०० किमी , ११२ दिवस , जीवनदृष्टी समृद्ध करणारा एक अविस्मरणीय अनुभव !
कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक आयोजित : नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन !
दृक-श्राव्य अनुभवकथन : वक्ते : शंतनु गुणे (परिक्रमावासी)
३१ मे २०२४ , सायं ६:१५ वाजता, विशाखा हॉल , कुसुमाग्रज स्मारक , विद्याविकास सर्कल जवळ, गंगापूर रोड , नाशिक १३
प्रवेश विनामुल्य

Leave a comment