मे २०२४ सिंगापूर ट्रीप मधील अनुभव !!

हा अनुभव आहे मे २०२४ च्या आमच्या सिंगापूर ट्रीप मधला !! या दिवशी आमच्या आयटर्नरीत , Marina Bay Sands या सिंगापूरची ओळख बनलेल्या आणि मरीना बे च्या समोर असणाऱ्या आलिशान हॉटेलच्या ऑब्झर्व्हेटरी डेकचा अनुभव समाविष्ट होता ! त्या लगतच असणारे, अतिशय नयनरम्य असे क्लाउड फॉरेस्ट , फ्लॉवर डोम आणि रात्री ८ च्या सुमारास असणारा लाईट अँड साऊंड शो ही त्या दिवशी आम्ही पाहणार होतो. ही सर्व ठिकाणे या देशाने केलेल्या तांत्रिक प्रगतीची द्योतके असून सिंगापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची आकर्षण केंद्रे बनली आहेत ! साहजिकच त्यामुळे पर्यटकांचा अखंड ओघ येथे सुरु असतो ! यात लांब विदेशातून आलेले पर्यटक, शाळांच्या सहली आणि सिंगापूरच्या समीपच्या देशांतून आलेले पर्यटक यांचा लक्षणीय भरणा असतो. अर्थात सर्व ठिकाणी असणाऱ्या तंत्रबद्ध शिस्त, कार्यतत्पर कर्मचारी वर्ग आणि सुनियोजनामुळे गर्दी असली तरीही सर्व पर्यटकांना चांगला वेळ देऊन ही ठिकाणे बघता येतात !

त्या रात्री ९ च्या सुमारास लाईट अँड साऊंड शो संपल्यावर आम्ही आमच्या हॉटेलवर परत जाण्यासाठी निघालो. गर्दीचे लोट आपापल्या पिकअप ठिकाणी पोहोचत होते. आम्हीही आमच्या पिकअप टॅक्सीच्या ड्रायव्हरशी संपर्क साधला आणि त्याने सांगितलेल्या पॉइंटवर पोहोचलो. तिथे पार्किंग लॉट मध्ये आमची पिकअप टॅक्सी दिसली आणि आमचा दहा जणांचा चमू सुखावला ! आमचा टॅक्सी ड्रॉयव्हर भारतीयच असून तामिळ भाषिक होता. तो वेळेआधीच येऊन उभा होता. हे तेथील पर्यटन वाहतुकीचे खूपच भावलेले आणि त्यांच्या व्यवसायिकतेचे लक्षण ! सर्व ड्रायव्हर मंडळी वेळेआधी १० मिनिटे उपस्थित असतात आणि अगदी वेळेत तुम्हाला तुमच्या हॉटेल अथवा साईट सीइंग पॉइंटला सोडतात. वेळ पाळण्याविषयी ते कमालीचे आग्रही असतात कारण त्यांना वेळ टॅग केलेला पर्यटक ग्रुपचा फोटो आपल्या मालकाला पाठविणे सक्तीचे असते. वेळ चुकली की त्यांचे पैसे कट होतात ! त्यामुळे दिवसभराचा पिकअप आणि ड्रॉप चा फ्लो सिक्वेन्स हाती घेऊन ही मंडळी अतिशय चोखपणे आपले काम करत असतात.

आम्ही पोहोचलो तो पार्किंग लॉट तसा बऱ्याच कमी गर्दीचा होता आणि अगदी तीन चारच व्हॅन्स तिथे उभ्या होत्या ! तिथे एक ज्येष्ठ भारतीय महिला अगदी रडवेल्या अवस्थेत उभी होती आणि भिरभिरत्या नजरेने आपल्या पिकअप टॅक्सी आणि ग्रुपला शोधत होती. तिची अवस्था पाहून आम्ही चौकशी केली. ती कन्नड भाषिक असल्याने मोडक्या हिंदीत तिने ती चुकली असल्याचे आम्हाला सांगितले. आजूबाजूला मले, इंग्रजी, तामिळ आणि मॅनडेरिअन भाषिक लोक जास्त असल्याने तिला कोणाशी संवाद साधता येत नव्हता ! आम्ही तिला, ती कोणत्या कंपनी / ग्रूप बरोबर आली असल्याचे विचारले. पण खूपच गांगरल्याने, भाषेच्या अडचणीमुळे तिला काही ते सांगता आले नाही आणि ती तिच्या टूर ग्रुप बरोबर असलेल्या पतीला शोधत असल्याचे समजले. तिच्या मोबइलवर इंटरनॅशनल रोमिंग घेतलेले नव्हते. मग आम्ही तिच्या कडून तिच्या पतीचा नंबर घेऊन त्यांना फोन लावला तर तो स्विच ऑफ लागत होता. मग आमच्या ड्रायव्हरने पुढाकार घेऊन तिला तिच्या हॉटेलचे नाव विचारले म्हणजे मग आमच्या रस्त्यात असते तर तिला सोडता आले असते. तिने एका नामांकित हॉटेल चेनचे नाव सांगताच आम्ही मॅपवर ते नाव टाकून शोधले. पण तिथे त्या चेनची बरीच हॉटेल्स होती. त्यातील नक्की कुठले हॉटेल तिचे आहे अथवा त्याचा एरिया कोणता हे काही तिला माहीत नसल्याने सांगता आले नाही. मग तिने भारतातील तिच्या मुलाचा नंबर देऊ केला. त्याला फोन लावला तर आश्चर्यकारकरित्या त्याला आपले पालक कुठल्या हॉटेलवर राहत आहेत, टूर कॉर्डीनेटरचा नंबर हे काहीही माहीत नव्हते ! आणि तिकडे तोही शरमिंदा होऊन चिंतेत पडला ! यात वेळ निघून जात असल्याने आमचा व्यावसायिक ड्रायव्हर, त्याला मदत करण्याची इच्छा असतानाही आम्हाला निघण्यासाठी खूप घाई करत होता कारण त्याला आम्हाला सोडल्यानंतर पुढचा पिकअप शेड्यूल्ड होता. त्याचेही तसे बरोबर होते. मग आम्ही त्या महिलेचे करंट लोकेशन भारतात तिच्या मुलाबरोबर शेअर केले आणि तिला तिथून न हलण्याविषयी सूचना देऊन सांगितले की ह्याच लोकेशनवर तुम्हाला तुमचा टूर कॉर्डीनेटर घ्यायला येईल. त्या चिरंजीवांनाही तसे कॉर्डिनेट करायला सांगून मग आम्ही नाईलाजाने गाडीत बसलो. त्यानंतर त्यांच्या मुलाने घरी कागदपत्रे ढुंढाळली असतील अथवा पालकांच्या मित्र परिवाराशी बोलणे करून टूर कंपनीचे डिटेल्स मिळवले असतील. सुमारे तासाभराने त्याचा आम्हाला मेसेज आला की संबंधित महिला आपल्या हॉटेलवर सुखरूप पोहोचल्या आहेत आणि मदत केल्याबद्दल तो आभारी आहे !
हा सर्व प्रकार अनुभवल्यानंतर मला झिम्मा चित्रपटात दाखविलेल्या अशाच एका दृश्याची आठवण झाली. परदेशी आपल्या ज्येष्ठ पालकांना टूरसाठी पाठविणाऱ्या मुलांनी किंवा अशी टूर घेणाऱ्या आणि विशेष करून ज्येष्ठ असणाऱ्या शिवाय टेक्नोसॅव्हीही नसणाऱ्या व्यक्तींनी काय काळजी घ्यायला हवी यावर मग आमची चर्चा रंगली आणि आम्ही सर्वानी मिळून काही मुद्दे मांडले !! आपण जात असल्याच्या टूर कंपनीच्या सर्व डिटेल्स, टूर ओपरेटर / कॉर्डीनेटरचा नम्बर, रहात असणाऱ्या हॉटेलचे नाव, पत्ता, तिथल्या रिसेप्शनचा नंबर, लोकल नातेवाईक अथवा परिचितांचा नंबर आपल्याला आणि घरच्यांना माहीत असायलाच हवा ! शिवाय ही सर्व माहिती प्रिंट केलेले कार्डही आपल्याजवळ (आणि बरोबर लहान मुले असल्यास त्यांच्या जवळही) कायम ठेवायला हवे. टूर विदेशात असल्यास त्या कालावधीपुरते आपले मोबाईल रोमिंग चालू करायला हवे. टॅक्सी करायची वेळ पडल्यास पुरेसे स्थानिक चलन खिशात कायम असायला हवे. शिवाय स्थल दर्शनाला निघण्यापूर्वी आपला मोबाईल शंभर टक्के चार्ज करूनच बाहेर पडायला हवे. यासाठी त्या देशात चालणाऱ्या इलेक्ट्रिक सॉकेटशी कम्पॅटिबल अडाप्टर जवळ हवा. स्थलदर्शनाच्या ठिकाणी फोटो/सेल्फी काढताना आपण आपल्या ग्रुप बरोबर आहोत ना, याचेही भान त्याने/तिने ठेवायला हवे ! आणि पर्यटक जर सक्षम मोबाईल वापरकर्ता असेल तर तेथील ओला / उबर सारख्या टॅक्सी सर्व्हिस अँपची माहिती हवी, ते फोनवर डाउनलोड करून कसे वापरावे ते शिकून घ्य्यायला हवे. गूगल मॅप, ट्रान्सलेशन सर्व्हिस सारखी अँप्स कशी वापरावीत हे माहित करून घ्यायला हवे.
थोडीशी काळजी घेऊन आपण आपली ट्रीप अशी थरारक / चिंताजनक न करता आनंददायी आणि सुखदस्मृती दायक करू शकतो ! म्हणजे मग “यांना कुठे न्यायची / पाठवायची सोय नाही” सारखे शेरे कोणीही कोणालाही देणार नाही आणि ट्रिप चा “एक सुखद ब्रेक” हा उद्देश्यही पूर्ण होईल !! सो मंडळी, बॅग भरून ट्रीपला बाहेर पडण्याआधी “कठीण समय येता… ” साठीही थोडी तयारी केल्याची खातरजमा नक्की करून घेऊयात !!

– अनुभव : सौ. वर्षा अंकुश सोनवणे,
शब्दांकन : डॉ. रुपाली दीपक कुलकर्णी
9011896681

Leave a comment