
– श्री. विनय कुलकर्णी
अजून नाही जागी राधा,
अजून नाही जागें गोकुळ
अशा अवेळीं पैलतीरावर,
आज घुमे कां पावा मंजुळ ll
माझ्या आईचे हे अगदी आवडते गाणे. आपण हे गाणे छान आणि सुरात म्हणतो हे माझ्या आईला पक्के ठावूक आहे. कुठल्याही घरगुती समारंभात माझ्या आईला गाणं म्हणण्याचा आग्रह झाला की, जी काही ठराविक गाणी ती अगदी तयारीने म्हणत असते, त्यापैकी हे एक गाणे आहे. सगळ्यांना ते आवडतंही आणि तिला तेच गाणं म्हणण्याचा आग्रह ही होतोच !
एकदा एखाद्या कविते ला गाण्याचा शिक्का बसला की आपण त्यातले काव्य बहुधा गृहीतच धरण्याचे पातक करतो असं माझ्या आजकाल लक्षात येतंय. “अजून नाही जागी राधा” या गाण्याच्या बाबतीत तर त्या काव्याकडे ठार दुर्लक्षच झालं होतं ! एक तर आईच्या आवडीचं गाणं म्हटल्यावर, मनातल्या मनात त्याला एक जुनाटपणा आपण उगीचच चिकटवलेला असतो. त्यात राधा , गोकुळ आदि संदर्भ, हे त्यात “नेहेमीचेच सारे” असाच भाव निर्माण करणारे, तेंव्हा शब्दांचा विचार करायची विशेष गरज नाहीच. पण तरीही, हे गाणे माझ्या लक्षात राहायचे, अगदी पाठ व्हायचे कारण म्हणजे माझ्या आई चे ते अगदी तन्मयतेने, जीव ओतून गाणे!!
पण हे गाणं म्हणजे मुळात एक कविता असू शकते, हे कधी लक्षातच आले नाही. आणि ते जेंव्हा लक्षांत आलं, तेंव्हा त्या काव्यवस्तूची व्याप्ती आणि त्यात शब्दबद्ध झालेला विराट भावाविष्कार पाहून मी अवाक झालो, छाती दडपून गेली आणि इतके दिवस जे फक्त गाणं होतं, ती इंदिरा संतांची कविता झाली !

कवयित्री इंदिरा संत
गमतीची गोष्ट म्हणजे या बदलाचा कारण ठरला चक्क आपला सचिन! हो हो, तोच तो!! सचिन तेंडुलकर!! सचिन रमेश तेंडुलकर!!!
प्रज्ञाचक्षु मुलांच्या शिक्षणात मदत म्हणून माझी पत्नी अनघा आणि तिचे सहकारी, अभ्यासक्रमाबाहेरची पुस्तके, गाईड्स, नोट्स आदी ऑडिओ रेकॉर्ड करून त्या विद्यार्थ्यांना पुरवतात. मी त्यांच्या या उपक्रमात एक वाचक म्हणून जमेल तेव्हा सहभागी होत असतो. बायकोच करतीये म्हटल्यावर आवडीच्या विषयाचे पुस्तक निवडून घेणे सोपे होते. मागच्या वर्षी, त्यात मुंबई विद्यापीठाच्या विल्सन कॉलेज चा एक अंध विद्यार्थी काही पुस्तके घेऊन आला. त्यात होते श्री. रमेश तेंडुलकर लिखित “मृण्मयी” हे इंदिरा संतावर त्यांनी लिहिलेले पुस्तक. मला बापड्याला तेंव्हा, कवयित्री इंदिरा संतांपेक्षा, हे चक्क सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी लिहिलेले पुस्तक म्हणून त्याची भुरळ पडली आणि मी ते पुस्तक बायकोकडून वाचायला, रेकॉर्ड करायला मागून घेतले!!
एखाद्या कवयित्रीच्या समग्र साहित्याचे अवलोकन करणे, तिच्या आयुष्यातील घडामोडींचा, बदलत्या भावविश्वाचा एक त्रयस्थ जाणकार म्हणून विचार करणे आणि या दोन्हींचा एकमेकांशी असलेला संबंध तपासणे, त्यावर अभ्यासक वृत्तीने विवेचन करणे, त्यातली सौंदर्यस्थळे दाखवताना त्याच्याशी इतर साहित्यकृतींशी, साहित्यिकांशी संदर्भ लावणे हे सारे सारे माझ्यासाठी एक अप्रूप होते. कारण, माझ्यासारखा एक सर्वसाधारण वाचक, कथा, कादंबरी, कविता वाचतो पण त्यावरील टीका किंवा परीक्षण वगैरे त्याच्या वाट्यास येत नाहीत. त्याअर्थी आर्टस् चा विद्यार्थी नशीबवान म्हणायला हवा. पण माझ्या वाट्याला आलेल्या या एका पुस्तकाने माझे डोळे उघडले. त्यातही मोठा दणका दिला, “अजून नाही जागी राधा” या कवितेने!! इंदिरा संतांच्या विलक्षण काव्यप्रतिभेचा एक भावोत्कट पदर माझ्यासमोर उलगडला गेला.
अजून नाही जागी राधा,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ.
मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन.
विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यामधले थेंब सुखाचे:
“”हे माझ्यास्तव…. हे माझ्यास्तव ….””
“मेंदी” या इंदिरा संतांच्या काव्यसंग्रहातली ही कविता. तेंडुलकर लिहीतात, पहाटेची शांत, निरव वेळ योजिल्यामुळे कुब्जेच्या भावनांना मधुर भावरम्य सूर लाभतो. अजून कशालाच जाग आलेली नाही. राधेलाही आणि गोकुळालाही! आकारांचे, रंगांचे, रूपांचे भेद स्पष्ट दिसू लागले नाहीत, अशा विलक्षण वेळी, अशा “अवेळी”, त्या निरव वातावरणात भरून राहिलेले पाव्याचे सूर, सौंदर्याला कुरुपतेविषयी वाटणारी ओढ व्यक्त करतात! हे सारे भारलेले वातावरण, आणि कुब्जे च्या मनात त्या अनपेक्षित अनुभूती मुळे निर्माण झालेली कृतार्थतेची जाणीव,
मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन
पैलतीरावरून ऐकू येणाऱ्या पाव्याच्या मंजूळ सुरांमधून फक्त जाणवणारे अमूर्त आभासी कृष्णरूप, आणि त्या पैलतीरावर जाण्याचा, कृष्णरूपात विलीन होण्याचा प्रयत्नही न करणारी ती कुब्जा! अर्ध्या पाण्यात स्वतःचे तन आणि मन ही त्यजून उभी असलेली ती कुब्जा!! ती का पैलतीरावर जाण्या आधीच स्वतः ला समर्पित करतेय?? तिला स्वतःच्या कुरुपतेमुळे कृष्ण अप्राप्य वाटतोय की कृष्णप्राप्तीसाठी तन आणि मन त्यजून निराकार होणे तिने स्वीकारले आहे??
या निराकार समाधि अवस्थेत, अवघे विश्व ओठी लावून कुब्जा तो मुरलीरव पिते आहे, ही कल्पनाच किती विराट आहे!
विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यामधले थेंब सुखाचे:
हे माझ्यास्तव…. हे माझ्यास्तव.
एका कुरुपतेचा शाप असलेल्या कुब्जेलाही त्या अशा “अवेळी” दिव्यत्वाचा स्पर्श होऊ शकतो, तिच्या प्रेमाखातर, भक्तीपोटी, फक्त आणि फक्त तिच्या साठी, हे कृष्णरूप देवत्व तिला लाभून ती कृतकृत्य होऊ शकते. यावेळी तिच्या डोळ्यांमधून वाहणारे आनंदाश्रू गाताहेत,
हे माझ्यास्तव…..
हे माझ्यास्तव…..
कुरुपतेला दुर्लभ असा हा अशरीर सौंदर्याचा स्पर्श, की हा मोक्ष??
– श्री. विनय कुलकर्णी

Leave a comment