
मेडीक्लेम काढायचे निश्चित झाल्यावर पुढचा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो की, माझे नेमके किती कव्हरेज असले पाहीजे? जास्त कव्हरेज घ्यायचे असेल तर प्रिमियम सुद्धा जास्त लागेल. मग आपली मानसिकता अशी होते की ‘कव्हरेज कडे बघू की प्रिमियम जास्त लागतो आहे याची काळजी करु?’ आणि हे सगळे करत असताना नेमके किती कव्हरेज खरंच गरजेचे आहे? हे कसे ओळखू ? ‘ असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
हेल्थ इन्शुरन्स ह्या विषयावर सुरु असलेल्या लेखमालेत मागे प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये आपण इन्शुरन्स पॉलिसी मधल्या वेटींग पिरियडची माहिती आपण घेतली. इन्शुरन्स वेळेवर करणे किती गरजेचे आहे याचे महत्व समजून घेतले. “तहान लागली की आपण विहीर खोदायची”, ही आपली मानसिकता असते. म्हणजे एखादे दुखणे आहे असे कळल्यावर मग आपण मेडीक्लेम पॉलिसी काढण्यासाठी प्रयत्न करतो.

ह्या विषयाची माहिती घेताना सगळ्यात आधी आपण कोणत्या निकषांच्या आधारे मेडीक्लेम कव्हरेज समजून घेऊ :
१. शहर?
आपण ज्या शहरात राहतो त्याठिकाणी आजारासाठी येणारा खर्च आणि इतर शहरांमध्ये येणारा खर्च ह्यात फरक असतो. त्यामुळे मेट्रो सिटी, शहरे आणि गावे यामध्ये इन्शुरन्स संस्था झोनप्रमाणे प्रिमियम आकारतात. आपण ज्या शहरात रहात आहोत तेथे येणारा हॉस्पिटलायझेशनचा खर्च किती असेल ह्याचा विचार करून आपले कव्हरेज किती असले पाहिजे हे ठरवले पाहीजे.
२. आपले राहणीमान अर्थात लाईफस्टाईल
आपला आर्थिक स्तर उंचावल्याचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्या राहणीमानावर अर्थात लाईफस्टाईलवर होतो. एखाद्या आजारपणासाठी अॅडमिट होताना आपण हॉस्पिटल चांगले निवडतो. योग्य डॉक्टर, मेडीकल सुविधा, नीटनेटकेपणा इत्यादी गोष्टींना महत्व देतो. मेडीक्लेम घेताना इन्शुरन्स कमी कव्हरेज घेतले तर त्याचा परिणाम क्लेम मिळताना होतो. पॉलिसीमध्ये सगळ्या खर्चांवर काहीतरी सब लिमीट्स / मर्यादा असतात. त्यामुळे मेडीक्लेम निवडताना आणि कव्हरेज निश्चित करताना ह्याचा विचार करुनच घ्या.
३. मेडीकल इन्फ्लेशन
इन्फ्लेशन म्हणजेच महागाई ! महागाईमुळे इतर खर्चांप्रमाणेच मेडीकल खर्चातही वाढ होत असते, त्याला मेडीकल इन्फ्लेशन असे म्हणतात. हल्ली मॉडर्न टेक्नोलॉजीमुळे सर्जरी करण्याच्या पद्धतीत सुसुत्रता आणि सुलभता आली आहे पण त्याचे खर्चही वाढले आहेत. त्यामुळे मेडीक्लेम निवडताना त्यामधून आपल्या आजारपणाचा पुरेसा खर्च मिळेल ह्या गोष्टी विचार नक्की केला पाहीजे.
४. पूर्वीपासून असलेले किंवा अनुवंशिक आजार
मेडीक्लेम काढताना त्यापूर्वीपासून जर आपण एखाद्या गोष्टीसाठी नियमितपणे औषधे घेत असलो किंवा एखादा आजार होऊन गेला असेल तर त्यासाठी भविष्यात मोठे आजारपण उद्भवू शकते. तसेच आपल्या आई वडीलांपैकी एखाद्याला काही आजार असेल तर त्याचा परिणाम भविष्यात आपल्यावर होण्याची शक्यता असते त्यामुळे ह्याचा विचार करून आधीच आपण आपले मेडीकल कव्हरेज निवडले पाहीजे.
५. आपले उत्पन्न आणि दायित्व
आपण महिन्याला आपले उत्पन्न, नियमितपणे असणारे खर्च ह्याचा विचार करतो आणि काही पैसे वाचवून त्याची गुंतवणूक करत असतो. जर आपल्याला काही मेडीकल इमर्जन्सी आली आणि मेडीक्लेम नसेल तर हीच गुंतवणूक मोडावी लागते. कारण आपले खर्च तर ठरलेलेच असतात. अशावेळी आपले उत्पन्न, आपल्या गुंतवणुकी (ठेवी) आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने एक योग्य कव्हरेजची मेडीक्लेम पॉलिसी असलीच पाहीजे.
मेडीक्लेम कव्हरेज घेताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा हे आपण आजच्या लेखामध्ये पाहीले. ह्याविषयी माहिती देणारा माझा व्हिडीयो तुम्ही बघू शकता.
लिंक – https://www.youtube.com/watch?v=UOoJBnRYN9U
– स्वरदा लगड कुलकर्णी
विमा सल्लागार आणि ब्लॉगर

Leave a comment