
मेडीक्लेम काढायचा विचार मनात आला की आपण आधी एखाद्या अॅडव्हायझरला गाठतो. आपल्या बद्दल माहिती सांगतो आणि इन्शुरन्सविषयी, त्याच्या प्रिमियमविषयी माहिती घेतो. प्रिमियमचा आकडा ऐकला की आपण विचारात पडतो. आपले नियमित खर्च, अचानक येणारे खर्च ह्याचा विचार करताना ‘आपल्याला कुठे काय होतेय इतक्यात ? आपण भरलेले पैसे वायाच तर जाणार ना? आपल्याला आत्ता तरी मेडीक्लेमची गरज नाहीये !!’ ,अशा मानसिकतेवर येऊन थांबतो.
मुळात मेडीक्लेम इन्शुरन्समध्ये प्रीमियम द्वारे जात असलेले पैसे हा खर्च नसतोच. तर भविष्यात येणार्या मेडीकल इमर्जन्सी साठी केलेली एक तरतूद असते. अनेकदा असेही होते की, हॉस्पिटलायझेशनचा एखादा अनुभव आल्यावर मग आपण पॉलिसी काढायला जातो. पण यामध्ये सगळ्यात आधी आपले होऊन गेलेले आजारपण हा सगळ्यात मोठा अडथळा असतो. प्रत्येक पॉलिसीमध्ये आधीपासून आलेल्या आजारपणासाठी/त्या संबंधित येणार्या आजारपणासाठी क्लेम मिळायला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो, ज्याला वेटींग पिरियड म्हणतात.
तर दुसरीकडे एखाद्या आजारपणासाठी आपल्याला थांबायचे नसेल तर अशाही काही पॉलिसी आहेत ज्यामध्ये आपण अतिरिक्त प्रिमियम भरुन वेटींग पिरियड कमी करुन घेऊ शकतो. ह्यामध्ये आपल्यावर अतिरिक्त प्रिमियम भरण्याशिवाय मात्र पर्याय उरत नाही. हे सगळं का होते तर जेव्हा मेडीक्लेम काढण्याची योग्य संधी होती तेव्हा “आपल्याला काय होतय,” हा विचार करुन आपण पॉलिसी काढण्याच्या योग्य संधीची वाट बघत बसतो.
बर्याचदा असेही होते की आपल्याला आलेले आजारपण एवढे गंभीर असते की कंपनी आपल्याला विमा नाकारते. अशावेळेस ग्राहक झालेल्या किंवा होऊन गेलेल्या आजारपणाबद्दल पॉलिसीमध्ये नमूद करायचे टाळतो. अशावेळेस तुम्हाला मेडीक्लेम मिळेलही पण क्लेम घेताना पूर्वीच्या आजारपणाची माहिती न दिल्यामुळे क्लेम रिजेक्ट होतो तसेच पॉलिसी रद्द होते मुख्य म्हणजे भरलेला प्रिमियमही परत मिळत नाही.
माझ्या आजपर्यंतच्या कारकीर्दीत मी अशा अनेक केसेस मी बघितल्या आहेत की ज्यामध्ये ग्राहकांचे वेळेवर मेडीक्लेम पॉलिसी न काढल्यामुळे नुकसान होते. आपल्या पॉलिसीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे वेटींग पिरियड आहेत, विशिष्ट आजारांसाठी किती वर्षाचा वेटींग पिरियड आहे हे माहीत असणे ग्राहक म्हणून गरजेचे असते.
आपल्याला पॉलिसी काढायची आहे हे आपण केव्हा ठरवतो? तर एखादा इन्शुरन्स एजंट मागे लागल्यावर, आपल्या परिचितांपैकी आजारपणाचे काही अनुभव आल्यावर, किंवा हॉस्पिटलायझेशनचा भरमसाठ खर्चाचा अनुभव आपण स्वत: घेतल्यावर ! पण इन्शुरन्सचे महत्व कळण्यासाठी हॉस्पिटलायझेशनचा अनुभव आलाच पाहिजे का? हॉस्पिटलायझेशन होऊन गेल्यावर पॉलिसी मिळण्यासाठी किती अडचणी येतात हे मी वर सांगितले आहेच, त्यामुळे हॉस्पिटलायझेशनची वाट बघू नका तर मेडीक्लेम पॉलिसी वेळेवर घ्या! .
पॉलिसीचा वेटींग पिरियड म्हणजे काय ह्याविषयी माहिती देणारा माझा व्हिडीयो बघण्यासाठी क्लिक करा.
https://youtu.be/np3JyCt9saw
- स्वरदा लगड कुलकर्णी
विमा सल्लागार आणि ब्लॉगर

Leave a comment