।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


AskSwarada: Mediclaim Insurance : आरोग्यविमा : काळाची गरज……

“हॅलो, मी शुभा मावशी बोलते आहे. काकांना अ‍ॅडमिट केले आहे. त्यांच्या छातीत दुखत होते. ट्रीटमेंट सुरु आहे पण डॉक्टरांनी खर्च खूप सांगितला आहे. आता मेडीक्लेम काढली तर काही होऊ शकते का?” मावशीचे वय ६५ आणि काकांचे ७३ आहे. त्यांचे वय बघता मेडीकल इमर्जन्सी केव्हाही येऊ शकते. ह्या मावशीला काही महिन्यापूर्वी मी मेडीक्लेमबद्दल माहिती दिली होती. आणि सगळी माहिती घेतल्यावर आज करु उद्या करु असे करत मेडीक्लेम काढायची राहूनच गेली. आणि आज हा फोन आला.

‘ मला काय होतं? माझी तब्येत एकदम ठीकठाक आहे मग मेडीक्लेमचे पैसे कशाला भरायचे? पैसे भरले आणि काही नाही झाले तर गेले ना पैसे वाया? ‘ असा विचार करून मेडीक्लेमची पॉलिसी काढणे म्हणजे आज करायचे काम उद्यावर ढकलणे. हा असा अनुभव अगदी नुकतेच नोकरीला लागलेले तरुण मंडळी असो किंवा आजी-आजोबा सगळ्यांच्या बाबतीत येतो.

माझ्या परिचयात एक ३३ वर्षीय तरुण व्यक्ती होती. नियमितपणे व्यायाम, वजन उंची मापात, कसलीही व्यसने नाही. तरीही वयाच्या ३३ व्या वर्षी फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले. ८ महिने सातत्याने उपचार मिळून देखील त्याचे दुर्दैवी निधन झाले. कंपनीची मेडीक्लेम, स्वत:ची मेडीक्लेम, कंपनीचा फंड, ह्या सगळ्या गोष्टी असूनदेखील हे सगळे त्याच्या उपचाराच्या खर्चाचा मानाने पुरेसे नव्हते.

एखादे हॉस्पिटलायझेशन झाले की आपण आपले साठवलेले पैसे खर्च करायला सुरुवात करतो. खर्च वाढत गेला की, आपल्या ठेवी किंवा गुंतवणूकीतील पैसे वापरणे, घरातले सोने विकणे असे पर्याय निवडले जातात. आजारपणाचा खर्च हा आपल्या आवाक्याबहेर गेला की परिचितांपुढे हात पसरून आपली ट्रीटमेंट पूर्ण करावीच लागते. अशावेळी एक विचार करावा, प्रिमियमसाठी भरलेले थोडे पैसे खर्ची जाणे योग्य की आपल्या ठेवी आणि साठवलेल्या पैशातून खर्च होणे योग्य आहे?

एकदा हॉस्पिटलायझेशन झाले की मेडिक्लेम काढली तरी त्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी पॉलिसीचा काहीही उपयोग नसतो. अशावेळी पेशंटच्या नातेवाईकांसमोर प्रश्न उभा राहतो की उपचारासाठी लागणारे पैसे कसे उभे करायचे? आपल्याकडे कोणाचेही मोठे आजारपण आले तर आपण पैशाकडे न बघता त्या व्यक्तीच्या उपचाराकडे बघतो. हॉस्पिटलच्या बिलाचे मीटर मात्र सुरुच असते. आपल्या बॅंकेतले पैसे आपण वापरत असतो. पण जर कितीही झाले तरी मेडीक्लेम नसल्यामुळे हा खर्चच असतो.

इन्शुरन्सविषयी विशेषत: मेडीक्लेमविषयी एकूणच खूप अनास्था आहे. एकूण लोकसंख्येपैकी केवळ ४०% लोकांकडे आरोग्यविमा आहे. आरोग्यविमा नसण्याची अनेक कारणे आहेत. इन्शुरन्सविषयी माहिती नसणे हे याचे सगळ्यात मोठे कारण आहे. आरोग्यविम्यामध्ये पैशाची गुंतवणूक करणे म्हणजे एक प्रकारे आपल्या ठेवी आणि इतर मालमत्ता सुरक्षित ठेवणे आहे हे लोकांना पटवून देणे खूप गरजेचे आहे. एकूण मालमत्तेच्या केवळ १०-१५% रक्कम (वार्षिक) आपण विमा हप्त्याच्या स्वरुपात गुंतवली तर मेडीकल इमर्जन्सीच्या वेळी लागणारी आर्थिक तरतूद होऊ शकते तर दुसरीकडे आपली मालमत्ता सुरक्षित राहू शकते….विचार करा!

आजारपण किंवा हॉस्पिटलायझेशनचा अनुभव आल्यानंतर मेडीक्लेम काढायचा म्हणल्यावर काय होऊ शकते याविषयी पुढचा लेख लवकरच……

मेडीक्लेम काढण्याची योग्य वेळ कोणती याविषयी माहिती देणार्‍या व्हिडीयोची लिंक सोबत दिलेली आहे. https://youtu.be/PhjYwshq7Ew

– Swarda Lagad Kulkarni

Insurance Advisor & Blogger


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment