।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


देणाऱ्याची भूमिका ..

कट्टर तत्वनीष्ठ विंदा करंदीकरांची एका लेखक मित्राने सांगीतलेली एक आठवण.आयुष्यात एकाही पुरस्काराचे पैसे त्यांनी कधी घरी सोबत नेले नाहीत. पुरस्कार घेतल्या बरोबर तिथल्या तिथे कोणत्यातरी संस्थेला ते दान करुन टाकायचे. 

“आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. कार्यक्रम रंगला. संपला. मी या मंडळाचा त्या वर्षाचा कार्यवाह. मानधनाची पाकिटे तिन्ही कविवर्यांना दिली. विंदा म्हणाले, ” तुमचे हाडाचे हॉस्पिटल कुठे आहे? “, ” टाटाच्या समोर, जवळच आहे. पाहायला जायचं आहे का कुणाला ? “, मी म्हणालो.

विंदाचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडीक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तिथे अनेक महिने असायचा. विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासूनच्या सोयीची कमतरता. त्यामुळे हॉस्पिटलात सक्तीचा निवास. नवीन पेशंट्सचा दट्ट्या असायचा. मग वॉर्डातले काही पेशंट्स पॅसेजमध्ये यायचे. पॅसेजमधून वॉर्डाबाहेरच्या मोकळ्या जागेत.

विंदाना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना ‘शोधून’ काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकीट काढलं. आमच्या मंडळाने दिलेल्या मानधनाच्या पाकिटात त्यांनी जिना चढतानाच थोडे पैसे (स्वतःजवळचे) भरले होते. ते पाकिट त्यांनी बाईंच्या हातात दिलं. “औषधासाठी होतील म्हणून शिरूभाऊंनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो. म्हटलं नेऊन देतो.”

थोड्या वेळाने आम्ही बाहेर पडलो. मीही विंदांबरोबर बसस्टॉपवर आलो. विचारू की नको अशा मनातल्या गोंधळावर मात करत मी प्रश्न विचारला. तोही घाबरतच. ” तुम्ही त्यांना मदत केलीत, पण शिरूभाऊंचे नाव का सांगितलंत? “. शिरूभाऊ म्हणजे बहुधा त्यांचे मित्र श्री. ना. पेंडसे असावेत.

विंदांनी त्यांच्या खास नजरेने माझ्याकडे आरपार बघितलं. ” असं बघा, घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखाली असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागतेय. अशावेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो. कमी नाही होत. अशावेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास वाढत तरी नाही. शेवटी महत्त्वाचं काय? त्या व्यक्तीला मदत मिळणं ! कुणी केली हे नाही ” .

माझी विंदांशी काही ओळख नाही. ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्या वेळी लागलेले हजारो वॅटचे लाईट अजून विझलेले नाहीत. देणाऱ्याने देताना, घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणं. ते सारे क्लेष क्षणभर अनुभवणे. पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणं आणि ” इदं न मम ” असं म्हणत यज्ञवृत्तीने दान करणे.

मी empathy ची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो याचा मला अभिमान आहे.

– माधव सावळे.

(स्रोत : कायप्पा )


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment