।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


लसीकरण मोहीम… पिकनिक ! : सौ. अपर्णा कुलकर्णी

कोरोना – लॉकडाऊन – Stay home, stay safe – यामुळे घरातली सिनियर सिटीझन मंडळी व लहान मुलं अगदीच वैतागून गेली होती. नंतर अनलॉक – न्यू नॉर्मल पर्व सुरू झाल्यावर लहान मुलं बाहेर पडून थोडा वेळ का होईना खेळू लागली, मित्र मैत्रिणींना भेटू लागली. पण घरातली ज्येष्ठ मंडळी मात्र पूर्णवेळ घरी राहणे, बाहेर पडले तरी पूर्णवेळ तोंडावर मास्क बांधून राहणे, कुठल्याही गर्दीच्या वेळी व गर्दीच्या ठिकाणी न जाऊ शकणे – या मुळे अगदीच कंटाळली होती.

…आणि एके दिवशी बातमी आली की कोरोनावर लस सापडली.. मग बातमी आली की सर्वप्रथम फ्रंट लाईन योद्ध्यांना लस देण्यात येणार.. त्यानंतर लसीकरण मोहिमेचा पुढचा टप्पा जाहीर झाला की ज्यात सर्व सिनियर सिटीझन व 45 वर्षे वयावरील कोमॉरबीडीटी असलेल्या मंडळीना ही लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले.
सर्व ज्येष्ठ मंडळींना ही खुशखबर मिळाल्यावर सगळ्यांना उत्साह वाटू लागला. लसीकरणाच्या र्निमित्ताने बाहेर फिरायला तरी मिळणार , ही कल्पनाच त्यांच्यासाठी सुखावह होती. शाळेत पिकनिकची नोटीस आल्यावर विद्यार्थी जसे खुष होतात ना , अगदी तशीच अवस्था!! फक्त त्यात रोल रिव्हर्सल झालेले होते!
शाळेच्या पिकनिक संबंधी पालकांच्या चौकश्या सुरू होतात- पिकनिक कुठे, कधी, कशी नेणार आहेत, किती पैसे ,कधी भरायचे वगैरे वगैरे..! आणि मुलं ही पिकनिकच्या कल्पनेने खुष होत राहतात, प्लॅन्स बनवत राहतात, काय खाऊ बरोबर न्यायचा – कोणकोणते खेळ खेळायचे, कुठला ड्रेस घालायचा इ. इ. …!!

☺️

आता ज्येष्ठांसाठी लसीकरण मोहीम जाहीर झाल्यानंतर त्यांची मुलं की जी आता त्या ज्येष्ठांचे पालक झालेले असतात- लसीकरण केंद्रांची माहिती घेणे, तिथली व्यवस्था कशी आहे याची माहिती घेणे, लसीकरणाच्या रजिस्ट्रेशन बद्दलची माहिती घेणे सुरू करतात . रजिस्ट्रेशन करून प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर आपला नंबर लागेपर्यंत व लसीकरण झाल्यानंतर अर्धा तास तिथे थांबून घरी परतेपर्यंत 3-4 तास सहज लागणार आहेत,ही माहिती ही त्यांना मिळते. घरातल्या ज्येष्ठांना ही माहिती मिळाल्यावर ते ही या 3-4 तासांचे प्लॅन्स बनवू लागतात. दंडावर इंजक्शन देणे /घेणे सोयीचे होईल असे कोणते कपडे घालायचे हे ठरवू लागतात ,तिथे 3-4 तास थांबायचे तर मग वॉशरूम्स ची सोय काय व कशी या ही चौकश्या सुरू करतात…एकंदरीत काय तर लॉक डाऊन दरम्यान आलेली मरगळ जाऊन एकदम उत्साह, लगबग, उत्सुकता सुरू होते…!!
☺️
आमच्या कडेही हीच परिस्थिती..!

☺️

रजिस्ट्रेशन करावे म्हणून लसीकरणाच्या साईट वरून हर प्रयत्न करून पाहिले पण पिनकोड, त्या एरियात असलेली लसीकरण केंद्रे व उपलब्ध स्लॉट ,आमची वेळ यांचे समीकरण जुळता जुळेना! अखेर काल मुहुर्त हुडकला व ‘लसीकरणाच्या पिकनिक’ ला जायचेच, असे ठरवले. किमान 3- 4 तास लागणारच असे मनाशी ठरवून ,इंजक्शन घ्यायला सोयीचे होतील असे कपडे घालून, जेवण करून मग दुपारी दीड पावणेदोन च्या सुमारास घरातून निघालो..अर्थात पुढच्या 3- 4तासांची बेगमी करूनच! बरोबर मधेच तोंडात टाकायला म्हणून बदाम, बिस्किटे, द्राक्षे असा खाऊ ही डब्यात भरून घेतला.पाण्याच्या दोन बाटल्या ही घेतल्या. आधार कार्डाचा आधार आवश्यक असल्याने ते ही सोबत होतेच. इतका वेळ मोबाईल ची बॅटरी टिकेल – न टिकेल ,म्हणून सोबत पॉवर बँक ही घेतली.. आणि आईसह निघालो. लसीकरण केंद्राचा पत्ता शोधून तिथंवर पोहोचेपर्यंतच्या रस्त्यावर आई ओळखीची दुकाने, नव्याने सुरू झालेली दुकाने, इतक्या दिवसांनंतर दिसणारी रस्त्यावरची वाहनांची रहदारी, मास्क बांधून का होईना पण फिरताना दिसणारी माणसे पाहात होती. आईचं वय 84-85 असल्याने तिला फार चालायला लागू नये म्हणून लसीकरण केंद्रावर तिला व्हील चेअर घेतली.सातव्या मजल्यावर जाऊन रजिस्ट्रेशन केले आणि लगेचच तिचा नंबर लागला व पाच मिनिटांत तिचे लसीकरण झाले. पुढचा अर्धा तास तिला वेटिंग लाऊंज मध्ये थांबायला सांगितले.दर पाच सात मिनिटांनी ,’आजी ठीक आहात ना, काही त्रास होत नाही ना ‘ अशी चौकशी ही होत होती.त्या दरम्यान माझे ही लसीकरण पूर्ण झाले व मला ही वेटिंग लाऊंज मध्ये अर्धा तास थांबायला सांगितले. ज्या आईने मला लहान असताना ट्रिपल- पोलिओ ची लस द्यायला नेले होते तिला आज मी ही कोरोना ची लस द्यायला घेऊन आले होते, या गोष्टीची दोघींनाही मजा वाटत होती. फक्त तेंव्हा मी इंजक्शन दिल्यानंतर रडत होते तर आत्ता आम्ही गप्पा मारत होतो आणि या क्षणांना फोटोमध्ये बंदिस्त करण्यासाठी लसीकरण केंद्राने तयार करून दिलेल्या सेल्फी पॉईंट कडे जाण्यासाठी उत्सुक होतो!!
☺️
लसीकरण झाल्यानंतरचा हा वेटिंग करण्याचा अर्धा तास अगदी हॅपनिंग होता बरं!! .. बरोबर हाss एवढा खाऊ, पाणी, पॉवर बँक असा सगळा जामानिमा नेला होता पण तो पिशवीतून बाहेरही काढला नाही! सभोवताली इतकी माणसं पाहून खूप छान वाटत होतं.. काही त्रास होत नाही ना अशी काळजी युक्त चौकशी सुरू होतीच 5- 5 मिनिटांनी, सेंटर ने तयार करून दिलेल्या सेल्फी पॉईंट कडे जाऊन फोटो काढून घ्यायची घाई ही होती, कारण तिथे क्यू होता.. लसीकरण झालेले सगळेच लसवन्त व लसवंती फोटो काढून घेण्यास उत्सुक होते..!!

😜😀

अखेर एकदाचा मनासारखा उत्तम फोटो काढून झाला. लसस्वी होऊन घरी परतल्यावर मोबाईलवर आलेल्या sms मधून लसीकरणाचे सर्टिफिकेट ही डाऊनलोड करून ‘याचि देही याचि डोळा पाहिलं’ आणि कसं कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.. हा हँग ओव्हर आता पुढचे 4-5 आठवडे नक्कीच टिकेल..!

🤓😂

आता पुढची पिकनिक 4 आठवड्यानंतर..त्या तयारीचेही वेध सुरू होतील लवकरच..!!

😂😂

– सौ. अपर्णा कुलकर्णी

Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment