महाराष्ट्र देशा 🚩🚩..
संतवाणीच्या भूपाळीने जागते ही भूमी,
गान कोकिळेच्या स्वरांनी, नाहते ही भूमी,
स्वातंत्र्यवीरांची कवने, जपते ही भूमी,
कुसुमाग्रजांची काव्ये, गाते ही भूमी !!
शिव–शंभूंच्या पराक्रमाची, गायी सह्याद्री हा गाथा,
स्वराज्य रक्षक बलिदानांनी, उजळ या भूमीचा माथा,
ज्ञान–तुका–नामा सह आळवी ही नाथा,
वपु–पुलं–कानेटकरांच्या अतुल–अवीट कथा !!
आषाढी–कार्तिकी निघे, श्रद्धा–भक्तीची वारी,
देशभरातून ज्ञानार्थी येती, विद्येच्या माहेरी,
सनी–सचिनची कर्मभूमी ही, क्रिडेची पंढरी,
अभिनयातील उत्तम रत्ने, इथे हिच्याच उदरी !!
देशभक्तीची, पराक्रमाची बीजे या देशा,
बुद्धी,भक्तीची, संतवाणीची रत्ने या देशा,
कला, क्रीडेची, विज्ञानाची खाणी या देशा,
मुजरा आमुचा स्विकारावा, श्री महाराष्ट्र देशा !! 🚩
मुजरा आमुचा स्विकारावा, श्री महाराष्ट्र देशा !!! 🚩
– डॉ. सौ. रुपाली दिपक कुलकर्णी, नासिक


Leave a comment