।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १२: श्री. दिलीप सिंह आणि लेखांक १३: श्री. माधवराव गडकरी — श्री. बलबीर अधिकारी

 

लेखांक १२: श्री.  दिलीप सिंह


   खरं म्हणजे दिलीप सिंह या व्यक्तीसंबंधी लिहायला घेतले तर एखादे पुस्तक सहज होईल परंतु त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ठ्ये सांगायला संक्षिप्त विवेचनच हवे. ही व्यक्ती आर.सी.एफ. सारख्या मातब्बर संस्थेत अध्यक्षाच्या पदापर्यंत चढली हे लौकिक अर्थाने खरे असले तरी ती ज्या ज्या पदावर राहिली त्या पदाची शान त्यामुळे वाढत गेली. 1967 सालापासून 1987 सालापर्यंत आम्ही सारे आर.सी.एफ. चे कर्मचारी त्यांच्या संपर्कात होतो. प्रत्येक जणाला असेच वाटत राही की ते फक्त आपल्याच निकट आहेत आपल्याशीच ते वैयक्तिक स्तरावर बोलतात. व्यक्तिमत्त्वाची मोहिनी म्हणतात ती हीच की काय कोणास ठाऊक !

   राजबिंडा गोरापान वर्ण, सुखद हास्य विलसत असणारा चेहरा, कंपनीचा गणवेष बहुदा वापरण्याची हौस, स्वत:ची सारी कामे स्वत: करण्याची तयारी, लोकांमध्ये मिसळताना विश्वासावर विसंबून धोका पत्करण्याची तयारी, राजस्थानी शालीनता प्रखर आत्मविश्वास या सार्या वैशिष्ठ्यांमुळे त्यांची प्रत्येक ठिकाणची उपस्थिती उल्लेखनीय असे. सार्या विभागातील सर्व स्तरावरच्या कर्मचार्यांशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क असे Through Proper Channel या उक्तीचा उपयोग फक्त कार्यालयीन परिपूर्तीसाठी असे. एरवी त्याला काही अर्थ नसे. सारा संपर्क एकट्या व्यक्तिने हाताळणे तसे फार अवघड खरेच पण दिवसाचे 18 तास कंपनीसाठी देऊन ते हवा तो परिणाम साधू शकत. कृतीशीलता इतक्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच इतरजण प्रेरित होऊन काम करीत कंपनीच्या एकूण कामगिरीवर ह्या सार्या प्रकारचा ठसा उमटे.

   दिलीपसिंह यांच्या कर्तृत्वाचा खरा बहर 1975 सालापासून सुरू झाला तो अखेरपर्यंत टिकला. त्यांच्यासमोर असणार्या अनेक आव्हानांना त्यांनी यशस्वीपणे तोंड दिले. कारखाना व्यवस्थापन, प्रशासन, विपणन, नवे प्रकल्प, सरकारी संपर्क बहुजन समाजासाठी अजून काहीतरी उपयुक्त करावे असा एकूण कल यात ते नेहमी मग्न असत. कर्मचारी कल्याण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. ते जेव्हा मुख्य औद्योगिक अभियंता म्हणून कंपनीत रुजू झाले, तेव्हा त्यांची गुणसंपदा इतरांच्या लक्षात यायला थोडा वेळ लागला. परंतु जेव्हा ते उपमहाव्यवस्थापक पदावर गेले त्यावेळी त्यांना सर्व तुर्भे खत कारखान्याचा कार्यभार पहावा लागला. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. आणि त्यांच्या नावाला महत्त्व एक वेगळे परिमाण प्राप्त झाले.

   आम्ही सुरू केलेल्या युवा संस्थेविषयी त्यांना आस्था होती. भैय्यासाहेब आगाशे अशोक वैद्य यांच्याविषयी त्यांना आत्मियता होती. त्यांच्या युवा कार्यक्रमांविषयी दिलीपसिंह नेहमीच समजुदारपणाची भूमिका घेत. शक्य ती मदत करीत. त्यामुळेच यूथ कौन्सिल, चेंबूर या संस्थेला आर.सी.एफ. वसाहतीत मोठी जागा प्रांगणासहीत मिळू शकली. येथे भेटी देणारे मंत्री, सरकारी सचिव वा इतर प्रतिष्ठित यांचे मत आर.सी.एफ. संबंधी चांगले झाले कंपनीची समाजातील प्रतिमा उंचावली.

   दिलीपसिंह यांच्या पाठिंब्यामुळे यूथ कौन्सिलने कोयना भूकंप, 1971 चे बांगला युद्ध, 72 सालचा दुष्काळ या प्रसंगी आर.सी.एफ. तर्फे मोठी मदत गरजूंसाठी पाठविली. अनेक रक्तदान शिबीरे, युवा शिबीरे, मराठी रंगभूमीवरील नाटके, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सहलीची सोय आदिंसाठी पाठबळ आर.सी.एफ. ने दिले. कोणताही इतर सरकारी पाठिंबा नसला तरी यूथ कौन्सिलने सेवेची वर्षे सत्कारणी लावली ती मुख्यत: आर.सी.एफ. च्या सहाय्यामुळेच.

   1976 साली तुर्भे खत कारखान्याचा पाचवा विस्तार होत आला होता. त्याचबरोबर प्रदूषणाचा मोठा प्रश् निर्माण झाला होता. जुन्या सयंत्रामध्ये बदल करून कारखान्यातून बाहेर पडणार्या जल, वायू धूळ प्रदूषणाचे प्रमाण कमी करायला हवे होते. सरकार वा शेजारी  या विषयी नापसंती व्यक्त करीत होते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून दिलीपसिंह यांनी उपबल्ध नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने यंत्रसामुग्रीमध्ये बदल केले. सयंत्रांचे आधुनिकीकरण केले आणि सामाजिक वनीकरणाचे महत्त्व ओळखून चेंबूर मधील प्रमुख नागरिक नेते यांच्या सहकार्यावर ““हरित चेंबूर”“ हा सामाजिक प्रकल्प सुरू केला. त्यांचे संपर्क काम मी अशोक वैद्य करीत असू. कंपनीचा पाठिंबा नागरिकांचे सहकार्य आमची जिद्द या जोरावर हरित चेंबूर प्रकल्पाने मोठी झेप घेतली. त्यातूनच वृक्षारोपण, भाजीपाला, फळे, फुले यांची प्रदर्शने, हिरवळी, परसातले बगीचे, कुंडीतील झाडांची विविधता वाढवणारे प्रकल्प निसर्गचित्राचे वर्ग असे अनेक उपक्रम निघाले. समाजमनाला वळण लावण्यासाठी त्यांना वृक्ष निसर्गमित्र बनवण्यासाठी अनेक गोष्टी झाल्या. परिणामी आजही चेंबूर हिरवेगार दिसण्याची किमया घडू शकली आहे. त्याचबरोबर वृक्षांनी धुळीचे प्रदूषण हवेचे प्रदूषण कमी केले आहे. चेंबूर हा पूर्वी बगीचा होता. आजही तो तसाच आहे. असहाय्यतेमुळे (गरजेमुळे) सुरू झालेेल्या प्रकल्पाचे सोने होऊन हा हरित सुगंध इतर शहरांमध्येही पोहोचला आहे. हा हरित सुगंध आणि त्यातला दिलीपसिंह यांचा वाटा वादातीत आहे.

   आर.सी.एफ. 1978 साली अस्तित्वात आली. तिचे पहिले अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक होण्याचा मान अर्थात दिलीपसिंह यांना मिळाला. हरित चेंबूर सारखी आणखी एखादी योजना समाजासाठी सुरू करावी असे त्यांच्या मनात होते. त्याचवेळी रायगड जिल्ह्यात खत कारखान्याची तयारी सुरू होती. त्या परिसरातील नव्या पिढीसाठी काहीतरी करायला हवे होते. त्यांना आधुनिक कारखान्यात भूमिपूत्र म्हणून संधी द्यायची तर तयार करायला हवे होते. शिकवायला हवे होते. नव्या कारखान्यात संगणकाच्या साथीने काम करायची तयारी करायला हवी होती. म्हणून आर.सी.एफ. ने असे वसतीगृह चेंबूर येथे सुरू करण्याचा संकल्प केला 16 ऑगस्ट 1978 रोजी चेंबूरचे सेवाभावी नेते श्री. हशू अडवाणी यांच्या हस्ते हा दुसरा प्रकल्प सुरू झला. आज या प्रकल्पामुळे 200 च्या आसपास तरूणांना आपले भवितव्य घडवण्याची संधी मिळाली आहे. त्यातून एक इंजिनीअर एक पदव्युत्तर पदवीधारक, 20 पदवीधर उरलेले 100 च्यावर दहावीबारावी पास विद्यार्थी आज आपल्या जीवनात स्थिर होऊ शकले आहेत ते केवळ या योजनेमुळे आणि या यशाचे शिल्पकार होते ते दिलीपसिंहजी !

   आपल्या कारकीर्दीतला शेवटचा प्रकल्प दिलीपसिंहजींनी 1985 साली पूर्ण केला तो म्हणजे थळ खत प्रकल्प वेळेच्या आत अपेक्षित भांडवलाच्या पेक्षा कमी रकमेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला तो दिलीपसिंहजींच्या कुशल मार्गदर्शनामुळे. आज थळ खत कारखाना कोकणपट्टीवर आधुनिक विजयदुर्गसारखा उभा आहे कोकणाच्या वैभव संपन्नतेची स्वप्ने पाहत आहे. या कारखान्याने आपल्या मागोमाग आय.पी.सी.एल. (नागोठणे) निप्पॉन डेन्रो (धरमतर) हे कारखाने त्याच क्षेत्रात आल्याचे पाहिले. प्रदूषणाच्या बाबतीत तुर्भे खत कारखान्याचे जे झाले ते होऊ नये म्हणून तेथे संगणकीकृत यंत्रणा बसवण्यात आली. उर्जा बचतीसाठी नवे मार्ग शोधण्यात आले. परिणामी या कारखान्याने या दोन्ही प्रकारातली राष्ट्रीय पारितोषिके मिळवली त्याचा पाया घालण्याचे काम दिलीपसिंहजींचेच होते असे म्हटले तर आश्चर्य वाटावयास नको.

   दिलीपसिंहजींना एक वर्ष सेवावाढ देण्यात आली. तथापि निवृत्ती अपरिहार्य होती. पण तोवर दिलीपसिंहजींची प्रतिमा इतकी उंच झाली होती की येणारे सारे दबकत. पण त्यांची सहिष्णुता कायम होती. स्वभाव तोच, आत्मियता तीच होती. त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर निरोप देण्यासाठी म्हणून सारे कर्मचारी एक झाले. निरोपसमारंभ गंगाधर देशमुख सभागृहात झाला. त्यांच्या विविध कार्यक्रमात असलेल्या सहभागाची छायाचित्रे प्रदर्शनात लावली होती. आर.सी.एफ. वसाहतीत त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सार्वजनिक उद्योगाच्या उपक्रमांचा अध्यक्ष खरे म्हणजे अतिथीगृहात भोजन करून छोट्या कार्यक्रमानंतर जायचा पण दिलीपसिंहजी त्या दिवशी   जनलाटेवर पहुडलेले आदर्श होते. प्रत्येक कर्मचार्याच्या नजरेत दिलीपसिंहजी यांची दैदिप्यमान छबी तरळत होती. चेहर्यावर कृतज्ञता !

   आर.सी.एफ. ला उच्च स्थानी असे माणिक लाभले म्हणून कंपनीची कधी पिछेहाट झाली नाही. सारेच म्हणत की अब आगेसितारोंसे भी आगे”“ मानवी प्रयत्न महात्त्वाकांक्षा याच बरोबर बांधिलकी नम्रता यांचे श्री. दिलीपसिंहजी प्रतिक आहेत, जे व्यक्ती नव्हे संस्था आहेत. अभंग अविचल अन् प्रवाही…!

लेखांक १३: श्री. माधवराव गडकरी


   1980 सालात माधवराव गडकरी मुंबई सकाळचे प्रमुख संपादक होते. त्या दरम्यान आमच्या कंपनीच्या थळ खत प्रकल्पासंबंधी जागा निश्चिती होऊन विविध कार्यक्रमांची रेलचेल उडाली होती. पत्रकारांचा एक गट घेऊन माधवराव रेवस, मांडवा, थळ, अलिबाग अशी पाहणी करीत होते. स्थानिक पत्रकार ही त्यांच्या समवेत फिरत होते. थळ येथे खत कारखाना उभा राहिल्यास त्यामुळे होणार्या चांगल्या वाईट परिणामांची चर्चा  होत होती. संवाद झडत होते. आमची मंडळी उत्तरेही देत होती. तथापि हे सारे त्यावेळी जरतर चे संभाषण होते. आज कारखाना सुरू होऊन तेथे विस्तारही सुरू झाला आहे हे लक्षात घेतले की त्यावेळी वाटणार्या अनेक शंका केवळ चर्चेचा भाग होत्या की काय अशी शंका यावी. तथापि चर्चा, प्रश् समाधान हे लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण आहे, असे मानले तर ज्या ठिकाणी प्रकल्प उभा राहायचा तेथील जनमनाचा आदर सहमती यांचा विचार प्रधानस्थानी येतो. माधवराव  स्वत: या घडामोडीच्या विरूद्ध नव्हते. किंबहुना त्यांनाही असा कायापालट हवाच असावा. कारण त्यामुळे कोकणवासियांचे जीवनमान सुधारेल, त्याला एक गति येईल नवमहाराष्ट्रात कोकणचा खरोखर कॅलिफोर्निया होईल अशी अटकळ ते मनाशी धरून होते. मी स्वत: या सर्व प्रक्रियेत एक शिलेदार असल्यामुळे माधवरावांशी माझा संपर्क येत होता. कामानिमित्त भेट होत होती. काही सूचना मिळत होत्या. अर्थकारणात समाजकारणही गुंतले असल्यामुळे मी अशोक वैद्य अनंत कुलकर्णी आमचे जनसंपर्क व्यवस्थापक जी. पी. देशमुख यांच्या समवेत होत असलेल्या समाजकार्यात आम्हाला सुख मिळत होते. रायगड जिल्ह्यात गंगा येत होती तिच्या प्रचंड जलौघाचे तुषार आम्हालाही पुनीत करून जनसागराकडे नेत होते.

   कालांतराने माधवराव लोकसत्तेत गेले. तेथेही प्रमुख संपादक झाले. आम्ही जेव्हा केव्हा लोकसत्ता कार्यालयात बातमी घेऊन पाऊल टाकीत असू तेव्हा जातांना त्यांच्या दरवाजाकडे पाहून आत जाण्याचा मोह होत असे. त्यांच्या बोलण्यातली ऋजुता, वाणीतला अधिकार त्याचबरोबर पदोपदी जाणवणारी आस्था शिवाय अनेक विषयांची माहिती यामुळे हा मोह होत असावा. तथापि वर्दळ सारखी चालू असल्यामुळे आणि आपल्याकडे फार महत्त्वाचे काही बोलायचे नाही या विचारामुळे पावले थबकत. त्यांना डिस्टर्ब करू नये असे  वाटे. ते तिथे आहेत या जाणीवेनेच उत्साह वाढे. हुरळून जाण्यासारखे फार काही नसले तरी एखादा संपादक कनिष्ठ पी.आर.. शी बोलताना आपलेपणा दाखवतो याचे सुख पी.आर.. झाल्याशिवाय कळू शकत नाही.

   एक प्रसंग बहुदा 1986 साल असावे. निफाड येथे समता परिषदेची मोठी सभा होती. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या या गावी अशी परिषद होणे औचित्याला धरून होते. खर्चही बरेच होते. काही कंपन्या पुस्तक प्रकाशन संस्था यांचे प्रदर्शन भरवून रक्कम उभी करावयाची होती. माधवरावांनी एक दिवस आम्हाला बोलावून हा प्रस्ताव दिला कंपनीचे प्रदर्शन दालन उभे करण्याची विनंती केली. आम्ही त्यांना बोलावले आमचे अध्यक्ष श्री. दिलीप सिंह यांची भेट घडविली. संमतीसहमती होऊन आम्ही प्रदर्शन उभे केले. समता परिषदेला मी श्रीकृष्ण कवठकर उपस्थित राहिलो. त्या काळात माधवरावांचा अनौपचारिक सहवास मिळाला. ज्या दिवशी ते आमच्या अध्यक्षांना भेटले त्या दिवशी गाडीतून जात असता जी.पी. देशमुखांचा विषय निघाला. योगायोगाने तो दिवस 20 नोव्हेंबर होता. देशमुखांचा स्मृती दिन. माधवरावांनी त्यांच्या प्रतिमेला हार घातला एकच वाक्य म्हटले.

   ““अधिकारी, समाजमनाशी बांधिलकी असणार्या देशमुख साहेबांना तुम्हा तरूणांना एवढ्या लवकर सोडून जायला आवडले नसेल. ते तुमच्या भोवतीच वावरत असतील.”“

   माधवरावांचे ते वाक्य आजही खरे वाटते. आम्ही निवृत्त झालो

तरी !

   माधवरावांचे गोवा प्रेम जगप्रसिद्ध आहे. पण कोकण विशेषत: रायगड त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणात सुबत्ता यावी, शिक्षण प्रसार व्हावा म्हणून पाटी फळा योजना सरकार तर्फे आली होती. खेड्यात मुळाक्षरे गिरविण्यासाठी मुलांकडे पाट्या नाहीत वा शिक्षकांकडे फळा नाही ही अत्यंत भयावह परिस्थिती त्यावेळी अनेक माध्यमिक शाळांमध्ये होती. आजही असू शकेल. योजना आल्यावर माधवरावांनी लोकसत्तेतून आपल्या सदरातून आवाहन केले. प्रतिसाद चांगला मिळाला. मोठ्या कंपन्यांच्या मदत यादीत आमच्या कंपनीचेही नाव होते. त्यांनी आम्हाला बोलावल्यावर रायगड जिल्ह्यात काही गावातील शाळांसाठी आम्ही मदत देऊ केली. त्यांना खूप बरे वाटले. उत्साहाने त्यांनी अशा शाळांना मदत घेण्यासाठी प्राथमिक माहिती देण्याचे आवाहन केले. परंतु प्रतिसाद शून्य. प्रति आवाहनही फुकट गेले. त्यामुळे माधवरावांना खडू फळा योजना सोडून द्यावी लागली.

   सतत जनसंपर्क कार्यमग्नता हा माधवरावांचा विषय आहे. त्यांची वार्तापत्रे, सदरे, स्फूट लिखाण रविवार विशेष अनेक पुस्तके रसिक जाणकार यांचे लक्ष वेधणारी आहेत पण माझ्यासाठी त्यांचा पिंड पत्रकार, समाजसेवक देशसेवकाचा आहे. इतरांचे, विशेषत: दुर्लक्षितांचे भले करण्यात त्यांना मिळणारे समाधान, त्यांच्या लेखणीला बळ देते. ते अधिकच वाढो हीच सदिच्छा अनेक जण व्यक्त करीत असतील.


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment