।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


तिचे अर्थभान …डॉ. रुपाली कुलकर्णी.

तिच्या अर्थभानावर बोलण्याआधी, आपल्या आजुबाजूला घडणारे अर्थाशी  निगडीत काही प्रसंग आधी पाहुयात. समजा,  श्री.  चिंतामणी आपल्या कुटुंबासाठी काही आर्थिक गुंतवणूक करतात किंवा करणार आहेत. अशावेळी घरातील सौ.चिंतामणींशी ते कसे संवाद साधतात ते पाहुयात. 

प्रसंग १:  शून्य  संवाद ! सौ.चिंतामणींना आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी  घरात माहिती देण्यास अजिबात आवडत नाही किंवा तसे करण्याची त्यांना आवश्यकताही वाटत नाही.  

प्रसंग २:  श्री. चिंतामणी आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी  केवळ इन्फॉर्मेशन म्हणून घरात शेअर बोलतात. त्यामागील उद्देश  काय  आहे  किंवा  इतर माहितीची चर्चा ते घरात करत नाहीत.  सौ.चिंतामणींनाही  त्याबाबतीत  कळत नसल्याने त्यांनाही अशी माहिती ऐकण्यात रस वाटत नाही.  त्यांची प्रतिक्रिया हंयापलीकडे जात नाही.

प्रसंग ३. : श्री.  चिंतामणी आपल्या  आर्थिक गुंतवणूकीविषयी  घरात उत्साहाने  सांगतात. त्यावर  सौ. चिंतामणी  सर्व माहिती ऐकून तर घेतात पण  मला कशाला हवी ही सगळी माहिती ? तुम्ही बघताय ना सगळं व्यवस्थित ? ठीक तर मग!अशी अंगकाढू प्रतिक्रिया देतात.   

प्रसंग ४: श्री. चिंतामणी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी  सौ.चिंतामणींबरोबर  सल्लामसलत करतात. आणि त्यांचेही मत ग्राह्य धरतात.

घरातील आर्थिक निर्णय असू देत नाहीतर चर्चा, आपल्या आजूबाजूला घडणारे हे आणि इतर अनेक अर्थपूर्ण असे प्रसंग पाहिल्यानंतर हे खचितच मनात येते की घरातील स्त्रियांची, कुटुंबासंबंधित घेतल्या जाणाऱ्या आर्थिक निर्णयांबाबत/ नियोजनामध्ये  नक्की  काय भूमिका असते ? आधुनिक जगातील स्त्री वर्गाला पुरेसे अर्थभान आहे का?’ घरातील स्त्री, मग ती स्वतंत्रपणे कमाविती असू देत किंवा नाही, तिचे घरातील आर्थिक निर्णयांबाबतचे मत अगदीच मोजक्याच घरांमध्ये (प्रसंग ४ प्रमाणे) जमेस  धरले जाते. याला कारण ठरते स्त्रीचे अर्थभान‘ !  वरील पहिल्या तीन  प्रसंगाची जरा कारणमीमांसा करूयात.

 

 प्रसंग १:  आर्थिक गुंतवणूक किंवा निर्णयांविषयी  पती-पत्नी दरम्यान शून्य  संवाद ! याची अनेक कारणे असू शकतात. आजच्या तथाकथित स्त्री -पुरुषसमानतेच्या काळातही बऱ्याच घरांमध्ये,  कुटुंबासंबंधित आर्थिक निर्णयांबाबत गोपनीयताराखली जाते. जिथे पत्नी आपल्या पतीच्या बरोबरीने संसाराचा आर्थिक रथ ओढत असते तिथेही असे चित्र दिसते तर गृहिणी असणाऱ्या पत्नीच्या बाबतीत तर काय कथा (आणि व्यथा) असणार? अशा प्रसंगात  पती-पत्नीच्या नात्यात  परस्पर विश्वास, सामंजस्य यांचा अभाव असल्याचे दिसते. कधी स्वभावातील काही गुणदोषांमुळे म्हणा किंवा त्यांच्या भोवतालच्या विशेष सलगीच्या लोकांमुळे म्हणा, घरासंबंधित  आर्थिक निर्णयांची वाच्यता  करणे बरेच जण हेतुपुरस्सर टाळताना दिसतात.  काही कुटुंब प्रमुखांच्या बाबतीत पुरेशी आर्थिक साक्षरता नसल्याने किंवा  बेफिकीर वृत्ती असल्याने,  घरात कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याशी निगडीत असणारी माहिती न दिल्याने कुटुंबाला काय परिणामांना सामोरे जावे लागू शकते याचे पुरेसे गांभीर्यच आलेले  नसते. हे समजावून घेण्यासाठी एक उदाहरण पाहुयात. आमच्याच कॉलनीमध्ये राहणारा अतुल. अतुलने दोन-चार व्यवसायांसाठी कर्जे काढलेली होती. त्या सर्व व्यवसायांमध्ये त्याला अपयश आले. मग झालेली उधारी चुकविण्यासाठी आपल्या मित्रवर्गाकडून, काही संस्थांकडून  त्याने आणखी कर्जे घेतली. आपल्या  घरात अर्थातच अशा व्यवहारांची  माहिती तो कधीच देत नसे. दुर्दैवाने, एका अपघातात अतुलचा स्वर्गवास झाला. मानसिक धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तर लगेचच अतुलने ज्या-ज्या संस्थांकडून/मित्रांकडून  कर्जे घेतली होती त्या त्या संस्थांचे अधिकारी तसेच  घरात कधीही माहित नसणारे मित्र, पैशांची मागणी करण्यासाठी  दारात येऊन उभे राहिले. अतुलच्या आर्थिक-व्यवहारांबाबत अनभिद्न्य असणाऱ्या त्याच्या घरच्यांना विशेषतः पत्नी मानसीला हे आर्थिक धक्केही  सहन करावे लागले ! पतीच्या पश्चात वृद्ध सासू -सासरे आणि लहान मुले यांच्या आर्थिक भवितव्याबाबत सचिंत असणाऱ्या मानसीचा या सर्व विवंचनांतून बाहेर पडता पडता अगदीच पिट्ट्या पडला. मानसीच्या या अनुभवातून बोध काय घ्यायचा तर अशा अनपेक्षित आर्थिक अडचणी, आपल्या कुटुंबीयांसमोर  कधी उभ्या राहू नयेत  नयेत  यासाठी कुटुंबातील हर एक व्यक्तीने आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती घरात वेळोवेळी दिली पाहिजे. घरातल्या स्त्रीनेही जबाबदारीपूर्वक सर्व आर्थिक व्यवहार जाणून घ्यावयास हवे आणि योग्य ठिकाणीच आपल्या घरातील पैसा वापरला जात आहे ना याबाबतीत दक्ष राहायला हवे. नाहीतर परिस्थितीचे आर्थिक चटके संपूर्ण कुटुंबालाच बसू शकतात हे या उदाहरणावरून स्पष्ट होते.       

 

प्रसंग २: काही घरामध्ये आपल्या आर्थिक व्यवहारांबाबत केवळ ‘इन्फॉर्मेशन’ स्वरुपात बोलले जाते. यात घरातील स्त्रीला आर्थिक व्यवहारांबाबत  काहीही गंध नसल्याने किंवा त्यात रस नसल्याने केवळ वरवरची माहिती म्हणून क्वचितच, कधीतरी सांगितले जाते.

इथे मात्र आर्थिक बाबींबाबत स्त्री-वर्गाची असणारी अनास्थाच अडचणींना कारणीभूत ठरते. समजून घेण्यासाठी कविताचे उदाहरण घेऊ. कविताला तिचा नवरा आशिष, घरासाठी केलेल्या आर्थिक तरतूदींबाबत  सुरुवातीला माहिती द्यायचा. पण  कविताला त्यातले फारसे कळत नाही हे लक्षात आल्यावर मात्र तिला त्याबाबत साक्षर करण्याऐवजी  त्याने आपल्या भावाला, प्रकाशला सर्व माहिती द्यायला सुरुवात केली.  आशिषकडून प्रकाशने  सर्व माहिती मिळविल्यावर प्रकाशने त्याला सल्ला द्यायला, गुंतवणुकीत फेरफार करायला सुरुवात केली. आशिषच्या दुर्दैवी निधनानंतर मात्र प्रकाशने कविताच्या नकळत तिच्या कुटुंबाकरिता नियोजलेली  बरीचशी संपत्ती स्वतःच लाटली. या कविताच्या कथेवरून काय दिसते तर आपल्याला अशा माध्यमांचे पुरेसे ज्ञान नाही हे वास्तवाला  आता वेळ नाहीकिंवा इतर कामे काय कमी आहेतअशा सबबी सॊयीस्कररित्या पुढे करुन, स्त्रिया दूर ठेवू पाहतात. आर्थिक बाबींमध्ये सहभागी होण्याच्या संधीला त्या आळसापोटी, अज्ञानापोटी वेळोवेळी दवडतात. म्युचुअल फंड्स‘ , ‘टॅक्स रिटर्न्स‘, ‘लोन रिपेमेंट ऑप्शन्स  इ. सारखे शब्द नुसते ऐकले तरी ते सगळे आमच्या ह्यांच्याशी बोलाअसा आपल्या ह्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करून स्त्रीवर्ग  स्वतःची सुटका करून घेतो. खूपच कमी स्त्रिया अशा सर्व बाबी स्वतंत्रपणे हाताळतांना दिसतात. केव्हाही, कुठल्याही आर्थिक विवंचनेस, अनपेक्षीतरित्या  सामोरे जावे लागू शकते ह्याची जाणीव ठेवून प्रत्येक स्त्री ने आर्थिक बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व आर्थिक योजनांचा, गुंतवणूक माध्यमांचा बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती जोपासण्याची आवश्यकता आहे.

प्रसंग ३: काही घरामध्ये कर्ता पुरुषवर्ग दक्षपणे आपल्या आर्धांगिनीला आपल्या कुटुंबास्तव केलेले  आर्थिक नियोजन समजावून सांगण्यासाठी आग्रही असणारा दिसतो. वरकरणी हे चित्र चांगले असले तरी अशा शेअरिंगमध्ये क्वचितच काही स्त्रिया जबाबदारीने सहभाग घेताना दिसतात. बहुंतांश स्त्रीवर्ग जोडीदारावर सर्व आर्थिक निर्णय सोपवून आर्थिक नियोजनातील आपली भूमिका अगदीच नगण्य करून घेतात. घरातील कर्त्यावर असणारा आर्थिक-विश्वास ही चांगलीच गोष्ट आहे मात्र असा विश्वास अनाठायीही असू नये हे कविताच्या उदाहरणातून समोर येते. आपला पेहराव, वागणे-बोलणे, घराचा चेहरा-मोहरा अप टू डेटठेवणारी स्त्री, तिच्या आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत मात्र  आउट-ऑफ-डेटदिसून येते. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल-मीडियाला  चुटकी(की बोटां)सरशी हाताळणारी स्त्री आर्थिक-निर्णय घेण्याच्या  बाबतीत मात्र  परावलंबीच आहे असे चित्र दिसते.आपल्या कुटुंबाकरिता कुठले आर्थिक निर्णय घेतले जातात आणि घ्यायला पाहिजे यावर स्त्रीलाही आपले स्वतंत्र, अभ्यासपूर्ण मत मांडता आले पाहिजे. आजकाल दरदिवशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने आर्थिक क्षेत्रातही बरेच बदल सुरु असतात. ते माहीत करून घेण्यासाठी तंत्रज्ञानही घरात दरडोई (दर हातात !) उपलब्ध असते, तेव्हा मनोरंजनाबरोबरच  आपल्या ज्ञानाच्या  कक्षाही त्यामुळे विस्तारता येतील का याचाही विचार आणि अंमल होणे गरजेचे आहे.

 

वरील प्रसंग आणि उदाहरणे  यातून आजच्या स्त्री वर्गाच्या आर्थिक साक्षरतेवर, दिसणाऱ्या अर्थाभानावर पुरेसा प्रकाश पडतो आहे. जेव्हा प्रत्येक स्त्री, स्वतः हुन, कौटुंबिक जबाबदारीच्या जाणिवेतुन आपल्या आर्थिक साक्षरतेच्या, स्वतंत्रतेच्या बाबतीत पुढचे पाऊल टाकू शकेल तेव्हा स्वतःच्या आणि पर्यायाने सर्वच कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ती उभी राहू शकेल. स्वतःच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, सुयोग्य अर्थभान मिळविण्यासाठी प्रत्येकीनेच जाणीवपूर्वक प्रयत्न करायलाच हवे.  तसे झाल्यास  प्रसंग ४ घरोघरी घडतांना दिसतील, नाही का ?

जाता जाता आपली आर्थिक साक्षरता वृद्धिंगत करण्यासाठी पुढील चेकलिस्ट देत आहे. ती स्वतःसाठी पडताळून पहा आणि त्यातील संदर्भांची माहिती करून घ्या !

           मी  आर्थिक सर्व-समावेशकतेसाठी सरकार तर्फे जाहीर करण्यात आलेल्या उपयुक्त आर्थिक  योजनांमध्ये  सहभागी झालेले  आहे का ? (उदा. पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना)

           मला  विम्याचे सर्व प्रकार, त्यांचे फायदे ठाऊक आहेत का? माझ्या सर्व कुटुंबियासाठी  अशा  उपाययोजना केलेल्या  आहेत  किवा नाही याची मला माहिती आहे का ? (उदा. आरोग्य / अपघात विमा)

           मला आर्थिक गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची पुरेशी माहिती आहे का ? (उदा. म्युचुअल फंड्स).  मी अशी गुंतणवूक माध्यमे हाताळण्यासाठी पुरेशी सक्षम आहे का?

           मला सोप्या आर्थिक संकल्पना आणि त्यांचे फायदे/ तोटे माहिती आहेत का ? (उदा. इन्फ्लेशन). मी त्यांचा वापर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासाठी करते का ?

           मला माझ्या घरातील सर्व आर्थिक गुंतवणुकीचा लेखा-जोखा ज्ञात आहे का? त्यासाठी  घरातील सर्व  आर्थिक व्यवहारांची,  निर्णयांची नोंद मी ठेवते का ?

           मी माझ्या घरातील कळत्या वयातील मुलांवर आर्थिक संस्कार देखील  करण्यास सक्षम आहे का?  त्यासाठी अद्ययावत असे ज्ञान माझ्याजवळ आहे का ?

           मी वर्तमानपत्रातील आर्थिक-क्षेत्रातील बातम्या, पुरवणी वाचते का?  आर्थिक-क्षेत्राशी निगडीत पुस्तके, ब्लॉग, कार्यक्रम यांचा वापर, मी माझ्या ज्ञानवृद्धी साठी  करते का?

मैत्रिणिनो, करा विचार, करा अंमल  ! जागवा स्वतःचे अर्थभान ! तुमच्यासाठी … तुमच्या लाडक्या  कुटुंबियांसाठी !!   

       

डॉ. रुपाली कुलकर्णी,

 ९०११८९६६८१

  alparambha@gmail.com                 

 

 


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment