–
“काय ऐकलंत का, रघुनाथराव?” सकाळच्या फेरफटक्यानंतर बागेतल्या बाकावर शेजारचे पाटील काका बसले होते. चष्म्याच्या काचा पुसत त्यांनी मोठ्या आवाजात हाक दिली. “देशमुख काकांचे खातं रिकामं म्हणे.”
“अरे देवा! कसं काय?” रघुनाथराव दचकले.
“फोन आला म्हणे. म्हणाला, “बॅन्क KYC अपडेट केले नाही, ओटीपी द्या. त्यांनी OTP दिला आणि पैसे उडाले. आता बघा, आयुष्याची कमाई एका मिनीटात साफ झाली.”
रघुनाथराव दीर्घ श्वास घेत म्हणाले, “आपण किती वर्ष फोन वापरतो आहे पण असे काही होवू शकते ह्याचा विचार करत नाही. एक मात्र आहे मोबाईलवर कोणी बोललं तर खरं वाटतं. त्यात बाई बोलली की अजूनच आपण भावनाप्रधान होतो,पाटील काका म्हणाले.

भारतामधील डिजिटल प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे. दोन दशकांपूर्वी मोबाईल फोन फक्त बोलण्यासाठी वापरला जायचा. नंतर मेसेज, मग इंटरनेट आणि आता बँकिंग, आरोग्य सेवा, सरकारी कागदपत्रे, मनोरंजन – नेटवर्क सारे सारे फोनमधे सामावलं आहे. कोव्हिडच्या काळाने ह्या प्रवासाला वेग दिला. घरातून बाहेर न पडता बिले भरायला, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला फोनच आधार ठरला. इच्छा नसतानाही आणि पर्याय म्हणून लहानमोठ्यांनी व्हॉट्सॉट्स, गुगल पे, ऑनलाइन वापर शिकून घेतले.. त्यात ऑनलाईन शाळा, ऑनलाईन क्लासेस.. इतकेच काय सिनीयर लोकांना ऑनलाईन ज्ञानेश्वरी, गीता, भजन, कीर्तन सगळं बोटाच्या एका क्लिकवर उपलब्ध झालेत. आणि आपण टेक्नोसॅव्ही झालो असे साऱ्यांनाच वाटू लागले.
पण ज्या प्रमाणात डिजिटल सोयी वाढल्या तितके धोकेही वाढवले आहेत अगदी तंत्रज्ञानात पारंगत असलेले लोक सुद्धा ह्या फसवणूकीला बळी पडतात. नवीन ॲप्स, नवीन लिंक्स, ओटीपी, सबसिडी बंद होणार म्हणून येणारे मेसेज, केवायसीचे मेसेजेस, corrupt files ह्यातून – प्रत्येक ठिकाणी जाळ टाकलं जातं आणि ह्यामध्ये सर्वात जास्त बळी ठरतात ते जेष्ठ नागरिक.
याची कारणं तितकीच स्पष्ट आहेत. एक म्हणजे विश्वास. सिनियर पिढीचे सारे आयुष्य विश्वास, सहजपणा ह्यातच गेले आहे. मोठ्या प्रमाणात होणारी फसवणूक ही थेट विश्वास ठेवणयामूळे होते. बँकेतून मेसेज, किंवा सरकारी खात्याकडून आलेला फोन किंवा मेसेज खरे असावं असं गृहीत धरलं जातं. नकळत आपण आपली माहिती पुरवतो आणि मग व्हायचं ते होतं.
दुसरं कारण म्हणजे तंत्रज्ञान. नवीन ॲप्स लिंक, मेसेजला उत्तर दिले जाते. फाईल्स ओपन केल्या जातात, माहिती पुरविली जाते आणि होत्याचे नव्हते होते.
तिसरं कारण म्हणजे चोरट्यांना अंदाज असतो तो जेष्ठांच्या आर्थिक स्थैर्याचा. निवृत्तीनंतर पगार नसला तरी स्थावर, पेन्शन, यथायोग्य रक्कम ठेवली जाते आणि हेच ह्या सायबर गुन्हेगारांना आकर्षित करतं.
चौथं म्हणजे एकटेपणा. मुलं शिक्षणासाठी बाहेर असतात कोणी विचारणारे नसतात. ह्या सगळ्या वातावरणात कोणताही आलेला मेसेज वा फोन माझ्या भल्यासाठी आहे हा विश्वास वाटतो हातून प्रतिसाद दिला जातो.
याची उदाहरणे कितीतरी आहेत. एकाला तुम्हाला केंद्रातून पोलिसांच्या मोबाईल मेसेज आला आहे.. “तुमची सबसिडी थांबणार आहे, लिंक वर क्लिक करा.” असा फोन आला. लिंक उघडून बँक डिटेल्स देईपर्यंत, काही तासांत लाखांचे नुकसान झाले.

आम्हाला देखील एक दिवस फोन आला. तुमच्या आधार कार्डावरून, दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या नावाने नवीन बॅन्क अकाउंट उघडला आहे. तुम्ही ह्या ह्या नंबरवर फोन करा. लगेच लक्षात आले आणि तो फोन आम्ही बंद केला. शिवाय सायबर सेलला फोन केला.
आर्थिक लुबाडणूक केवळ आपले आर्थिक धन लुबाडते. पण जेंव्हा कोणाचे फोटो माॅर्फ करण्यात येतात, किंवा कोणाला व्यक्तीगतपणे सोशल मीडियावर ट्रोल केले जाते, त्यावेळी त्या व्यक्तीचे मनोधैर्य खचून जाते. आत्महत्येची कितीतरी उदाहरणे आपण बघतो. मधे मधे Ghibili सॉफ्टवेयर वापरून लोकांनी आपले फोटो म्हातारपणी कसे दिसू ह्याचे रूपांतरण केले. तसेच आज जर मी ७० वर्षाची आहे, तर २० व्या वर्षी कशी दिसत असणार, असे साॅफ्टवेयर वापरून खूप फोटो social media वर उपलब्ध करून दिले. पण ह्याचा फायदा साबर गुन्हेगार घेवू शकतात, हे आपण विसरतो. उत्साहाच्या भरात, आपण काय करतो आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, हे देखील आपण विसरून जातो. कितीही सावधगिरी बाळगली तरी कधी कधी माणूस फसतोच. आज भारत सरकारने, अश्या फसवेगिरी विरूद्ध, मदतीची साधने उपलब्ध करून दिली आहेत. केंद्र राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० ह्या क्रमांकावर आपण आपली फसवणूक नोंदवली पाहिजे. जितका जास्त वेळ अशी फसवणूक नोंदविण्यास कराल, तितकीच तुमच्या फसवणुकीची शक्यता जास्त असते. त्वरीत मदत घेतल्यास सामान्य नागरिकांना सुटकेचा मार्ग मिळू शकतो. बँका आणि पोलीस समन्वयाने काम करून ह्या आर्थिक गुन्हेगारीचा पर्दाफाश करू शकतात. आपली फसवणूक www.cybercrime.gov.in
या संकेतस्थळावर नोंदवा. महाराष्ट्र सायबर सेल कार्यरत होवून आपली मदत करू शकते. ह्याचा मला देखील चांगला अनुभव आहे. फक्त तुम्हाला संयम आणि थोडी e- साक्षरता हवी.
सायबर सुरक्षा हा फक्त तंत्र शब्द नाही, तर आपल्या दैनदिनी जीवनाचा भाग झाला आहे. मोबाईल वा संगणकावर बँकिंग करताना, ऑनलाइन खरेदी करताना, सोशल मीडियावर माहिती शेअर करताना सजग राहणे हीच खरी सुरक्षा आहे. निवडक डिजिटल साधनांचा वापर करा, कारण त्याने जीवन सोपं होते. जसं आपण घरादाराला लॉक करतो, तसं डिजिटल सावधगिरीचं कुलूप लावलं पाहिजे. आपला फोन उघडण्याकरिता पासवर्ड ठेवा. फोन मधे कुठल्याही प्रकारचे बॅंक डीटेल्स, पासवर्ड नोंदवू नका. काही साध्या गोष्टींची आठवण ठेवली तर आपण सुरक्षित राहू शकतो. प्रत्येक कॉल किंवा मेसेज खराच असेल असं समजू नका. बँक कधीही ओटीपी किंवा विचारात नाही. अनोळखी लिंक वर क्लिक करू नका. मुलं, नातवंड, कुटुंबीयांशी सतत संवाद ठेवा. मदत मागणे ही कमजोरी नाही, ती शहाणपणाची खूण आहे. डिजिटल क्रांतीने आपल्या जीवनाला नवे पंख दिले. पण या पंखांचा आनंद घ्यायचा असेल तर सुरक्षिततेची, तितकीच मूल्याचीही जबाबदारी आपली आहे. पैशाहून अधिक श्रीमंती म्हणजे आत्मविश्वास आणि मनशांती. आणि त्याचं संरक्षण करण्याची गुरुकिल्ली आपल्या समोर आहे. ती म्हणजे सावधगिरी आणि देखरेख करणे.

डाॅ.सौ. मृणालिनी दोडके

Leave a comment